Nitin Gadkari on BJP Policy Neglecting Senior Workers: केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी स्पष्ट व परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ज्येष्ठतेमुळे त्यांच्या अशा बोलण्याचा प्रतिवाद पक्षातून कुणी करत नाही. अलीकडे त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांच्या उपेक्षेवर कठोर भाष्य केले. गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर ग्रामीणमध्ये पक्षाची धुरा सांभाळणारे डॉ. राजीव पोतदार यांच्यावरचा अन्याय केव्हा दूर होणार असा त्यांचा जाहीर प्रश्न होता.

गडकरी स्वत: शाकाहारी पण या अन्यायाची तुलना त्यांनी केली ती चमचमीत मांसाहाराशी. घर की मुर्गी दाल बराबर व बाहेरून येणाऱ्यांना सावजी चिकन हे धोरण पक्षात किती काळ चालणार असा सवाल करून त्यांनी भविष्यात हेच सुरू राहिले तर जेवढ्या वेगाने पक्षाला यश मिळाले तेवढ्याच वेगाने अपयशाला सुद्धा सामोरे जावे लागेल असा इशारा दिला. आता प्रश्न असा आहे की गडकरींची ही भावना पक्षात गांभीर्याने घेणार तरी कोण?

२०१४ मध्ये देशाच्या राजकारण नरेंद्र मोदींचा उदय झाला आणि भाजपच्या विजयाचा घोडा चौखूर उधळू लागला. जवळपास प्रत्येक निवडणुकीतील विजयाने या पक्षातील समीकरणे पूर्णपणे बदलली. त्यासाठी या पक्षाने जे ‘आयाराम’चे धोरण अवलंबले त्याने जुने कार्यकर्ते बाजूला फेकले गेले व पक्षात नव्याने येणाऱ्यांना संधी मिळत गेली. याचे एकमेव कारण म्हणजे प्रत्येकवेळी पक्षाने बाळगलेली विजयाची आस. गडकरींचे विधान नेमके त्यावर बोट ठेवणारे आहे. भाजपवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष नियंत्रण आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. पक्षाच्या संघटनात्मक रचनेत सुद्धा संघाचा माणूस हमखास असतोच. त्यामुळे पूर्णपणे ‘कॅडरबेस’असे स्वरूप पक्षाला आलेले. प्रत्येकवेळी विजय मिळायलाच हवा या अट्टाहासामुळे अलीकडे हे स्वरूप पूर्णपणे विस्कळीत झालेले.

 जे जुने कार्यकर्ते, पदाधिकारी होते ते आहे तिथेच राहिले व जिंकण्याची क्षमता असलेले लोक पक्षात सामील होऊन नेते झाले. यामुळे जुन्यांमध्ये सुरू झालेली खदखद इतकी वाढली की ती या पक्षात अजूनही स्थान टिकवून असलेल्या जुन्या नेत्यांना सहन होईना! गडकरींचे वक्तव्य आले ते यातून. सध्या सर्वत्र विजय व सत्ता मिळण्याचे दिवस असल्याने सध्याच्या नेतृत्वाला या खदखदीकडे लक्ष देण्यास वेळ नाही. पक्षासाठी आधीपासून कष्ट उपसणाऱ्यांनाही उघड नाराजी व्यक्त करून मिठाचा खडा कशाला टाकायचा असे वाटते.

नेमका या मौनाचा फायदा घेत गडकरींनी या मुद्याला तोंड फोडले आहे. पक्षाला सत्ता मिळाल्यावर आधीच्या कालावधीत केवळ हरण्यासाठी लढणाऱ्या अनेकांचे पुनर्वसन झाले. मात्र काहीजण तसेच दुर्लक्षित राहिले. त्यांच्याकडे पक्ष कधी लक्ष देणार हा गडकरींचा सवाल आहे व तो रास्त आहे. पक्ष सलग सत्तेत असला की आयारामांची गर्दी वाढते. मग तो कुठलाही पक्ष असो. अशावेळी कुणाला जवळ करायचे व कुणाला नाही याचा विवेक पक्षनेतृत्वाला ठेवावा लागतो.

भाजप नेमके हेच विसरला. पक्षाला पहिल्यांदा निर्विवाद यश मिळाल्यानंतर आहे ती सत्ता टिकावी तसेच संघटनात्मक शक्ती वाढावी यासाठी दुसऱ्या पक्षातील प्रभावशाली नेत्यांना संधी देणे एकदाचे समजून घेता येईल. पण, वारंवार सत्ता मिळूनसुद्धा पक्षाचे धोरण तेच राहिले. त्यामुळे पक्षात बाहेरून आलेल्या व नेते झालेल्यांची संख्या बेसुमार वाढली. गडकरींनी नेमके याकडे लक्ष वेधले आहे. हे जे बाहेरचे आहेत त्यांना सावजी मटणाची थाळी का वाढता, पक्षातल्या जुन्याजाणत्यांना घर की मुर्गी का समजता असा प्रश्न उपस्थित करून ते मोकळे झाले. यामुळे त्यांच्या विधानाला टाळ्या पडल्या इथवर ठीक पण गडकरींनी कान टोचूनही पक्षाच्या सध्याच्या धोरणात बदल होईल का? सत्ताकारणात संधी देताना जुन्यांचा विचार होईल का? याची उत्तरे आजही कुणी ठामपणे देऊ शकत नाही. गडकरी केंद्रीय मंत्री असले तरी ते पक्षाच्या संघटनात्मक कार्यापासून तसे दूर आहेत. नागपूर वगळता इतर ठिकाणी त्यांचे मत प्रत्येकवेळी विचारात घेतले जाईल अशी स्थिती सध्या नाही. त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य करताना उपस्थित असलेले पक्षाचे नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव घेतले.

राज्यात काम करणाऱ्या नेत्यांनी तरी किमान या अन्यायाकडे लक्ष द्यावे असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवले. गडकरी हे बोलले कामठीच्या एका कार्यक्रमात. याचवेळी त्यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे असेच सुरू राहिले तर पक्षाला भविष्यात अपयश येण्याचा. तोही पक्षातील कुणी गंभीरपणे घेईल याची खात्री आज बाळगता येत नाही. सत्तेचे राजकारण करणारा पक्ष असो वा व्यक्ती. त्याच्या अंगावर सूज येतेच. ती भविष्याकडे कानाडोळा करायला भाग पाडते. नेमके तेच भाजपच्या बाबतीत घडायला नको अशी गडकरींची या वक्तव्यामागील भावना. सत्तेच्या मिषाने जवळ येणाऱ्या बांडगुळांची एक जमातच ठिकठिकाणी तयार झाली आहे. स्वत:चे प्रभावक्षेत्र टिकवण्यासाठी हे लोक पक्ष कुठलाही असो, सत्तेत आला की त्याला चिकटतात. एकदा सत्ता गेली की लगेच पळ काढतात. त्यांना सत्ताधारी पक्षाच्या विचारसरणीशी, ध्येयधोरणाशी काही देणेघेणे नसते. पक्ष सत्तेतून हद्दपार झाला की ही जमात पटापट उड्या मारून नव्या सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जाते. अशी वेळ आली तर भाजप काय करणार? पुन्हा जुन्यांवर अवलंबून राहणार का हे गडकरींनी या वक्तव्यातून अगदी योग्य पद्धतीने सूचित केले. अर्थात सध्याची परिस्थिती बघता संघटनेवर नियंत्रण ठेवून असलेले कुणीही त्यांच्या म्हणण्याकडे गांभीर्याने बघणार नाहीत पण गडकरींच्या ‘खऱ्या’ बोलण्याची चर्चा मात्र दीर्घकाळ होत राहील हे नक्की!