नेत्ररोग तज्ज्ञांकडे येणाऱ्यापैकी निम्म्या मुलांना चष्मा

महेश बोकडे

नागपूर : दीड वर्षांपासून करोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरूच आहे. त्यासाठी तासनतास मुले संगणक, मोबाईलचा वापर करतात. घराबाहेर पडण्यावर मर्यादा आल्याने टी.व्ही.पुढे बसण्याचा वेळही वाढला. त्याचे परिणाम मुलांच्या डोळय़ांवर होत आहेत. मेडिकल, मेयो आणि एम्स या शासकीय रुग्णालयांत येणाऱ्या निम्म्याहून अधिक मुलांना चष्मे लागले, असे निरीक्षण वरील रुग्णालयातील नेत्ररोग तज्ज्ञांनी  नोंदवले आहे. मुलांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि दुसरीकडे करोनाच्या साथीमुळे मुलांना शाळेत जाऊन शिक्षण घेणे अवघड झाले आहे. साथीने थोडे जरी तोंड वर काढले तर सर्वप्रथम बंद होते ती शाळा. त्यामुळे मुलांना ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नाही. गत दीड वर्षांपासून शाळा ‘ऑनलाईन’च सुरू आहेत. ज्यांच्याकडे संगणक, लॅपटॉप आहे ते त्यावर तर ज्यांच्याकडे ही सुविधा नाही ते मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. तासनतास मोबाईल किंवा संगणकाच्या स्क्रीनकडे बघत राहिल्याने मुलांची दृष्टी कमजोर होत असून अनेकांना कमी वयातच चष्मे लागले आहेत.

नेत्ररोग तज्ज्ञांच्या मते, ३ ते १७ वयोगटातील मुलांमध्ये पूर्वी चष्मे लागण्याचे प्रमाण १० ते १५ टक्के होते. करोना काळात ते दुपटीने वाढले आहेत. पूर्वीही मुले, संगणक किंवा मोबाईलचा वापर करीत असले तरी त्याचे प्रमाण मर्यादित होते. मुलांचा बराच वेळ शाळेत जात होता. ऑनलाईन शाळांमुळे शाळेचा वेळ संगणक, मोबाईलपुढे बसण्यात जातो. शिवाय करोनामुळे जीवनशैलीतही बदल झाले. मुलांचे घराबाहेर पडणे कमी झाल्यामुळे ते व्हिडीओ गेम खेळू लागले. समाज माध्यमांचाही वापर वाढला. अनेक तास एकसारखे  स्क्रीनकडे पाहिल्याने डोळय़ावर परिणाम होतो. यातून चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले.

दृष्टिदोष का होतो?

मोबाईल, टीव्ही, संगणकाच्या वाढत्या वापराने डोळय़ांवर ताण येऊन  डोळय़ातील बाह्य आवरण कमी होते. डोळे कोरडे पडतात आणि डोळय़ांचे स्नायू थकतात. परिणामी, चष्मा लागतो. लहान मुले एका कुशीवर झोपून मोबाईल पाहतात, त्यामुळे एकाच डोळय़ावर जास्त ताण येतो, यातून त्यांना डोळय़ाची समस्या उद्भवते. मोबाईल वापरण्याच्या चुकीच्या पद्धती, मोबाईलचा ब्राईटनेस जास्त असणे, स्क्रीन छोटा असणे, ‘फाँट साईज’ कमी असणे याचाही डोळय़ांवर ताण वाढून चष्मा लागतो.

तज्ज्ञांचे निरीक्षण काय?

मेडिकल रुग्णालयातील नेत्ररोग विभागात रोज ३०० रुग्ण येतात. त्यात ५० रुग्ण हे १ ते १७ वयोगटातील असतात. पूर्वी यापैकी ५ ते ७ मुलांना चष्मा लागायचा. परंतु  करोना काळात या संख्येत ५० टक्के वाढ झाली. मेयोच्या नेत्ररोग विभागात दिवसाला  येणाऱ्या २०० रुग्णांमध्ये ४० मुलांचा समावेश असतो. आता यापैकी  ५५ ते ६० टक्के मुलांना चष्मा लागत आहे. एम्समध्ये येणाऱ्या १०० डोळय़ांच्या रुग्णांपैकी १५ मुले असतात. यापैकी ६० टक्के मुलांना चष्मा लागतो, असे निरीक्षण वरील रुग्णालयातील नेत्ररोग तज्ज्ञांनी नोंदवले. 

ही काळजी घ्या..

ऑनलाईन वर्ग करताना शक्यतोवर मोठय़ा स्क्रीनचा वापर करावा, पापण्यांची नियमित उघडझाप करावी, डोळे कोरडे पडू नये म्हणून नेत्ररोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने ‘आयड्रॉप’ वापरावा.  शाळेव्यतिरिक्त मोबाईल, टीव्हीचा शक्यतोवर वापर टाळावा. संगणक, मोबाईल स्क्रीनपासून योग्य अंतर राखावे, असे मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. राजेश जोशी यांनी सांगितले.

मैदानी खेळांचीही गोडी लावा

हल्ली मुले घरात असतात. त्यांचा ओढा इलेक्ट्रॉनिक गॅजेटकडे असतो. त्यामुळे डोळय़ांवर परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी मुलांना मैदानी खेळाकडे वळवावे तसेच त्यांना व्यायामाचीही सवय लावावी.

– डॉ . रवी चव्हाण, विभागप्रमुख, मेयो.

आहारावर लक्ष केंद्रित करा

मुलांना रोज दूध, फळे द्यावी, त्यातून अ आणि ई जीवनसत्त्व मिळते. ‘जंक फूड’ टाळावे, मुलांना चष्मा लागल्यास त्यासाठी उत्तम दर्जाचा काच (ग्लास) वापरावा.

– डॉ. प्रवीण गादेवार, गादेवार आय केअर, नागपूर.

शिक्षकांचे समुपदेशन फायद्याचे

करोनाचे संक्रमण यापुढेही सुरूच राहणार असल्याने ऑनलाईन शाळा हाच पर्याय असू शकेल. त्यामुळे डोळय़ावरचा ताण कमी करण्यासाठी पालकांना शिक्षक योग्य समुपदेशन करू शकतात. शिक्षकांनीही नेत्ररोग तज्ज्ञांकडून समुपदेशन करून घ्यावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– डॉ. पूजा बंग, विभाग प्रमुख, एम्स.