उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांचा इशारा

उत्तरांखडमध्ये चीन आणि भारत यांची सीमारेषा निश्चित नाही. चीनने धमक्या देऊ नये आणि त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. भारतीय सेना कुणाचाही सामना करण्यासाठी सक्षम आहे, असे इशारावजा मत उत्तरांखडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी नागपूर येथे व्यक्त केले.

सीमावादावरून चीनसोबत भारताचे संबंध ताणले गेले आहे. याच पाश्र्वभूमीवर चिनी सैनिकांनी उत्तराखंडमधील चामोलीजवळ घुसखोरी केली आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमाशी बोलताना रावत यांनी चीनला इशारा दिला. चीन आणि भारताच्या सीमेवर बराहोती नावाचे स्थान आहे. या वादग्रस्त भागात घुसखोरीचा प्रकार घडला. याबाबत अधिकृत माहिती नसली तरी या सीमा भागात चिन्हांक नसल्याने कोणता भाग चीनचा व कोणता भारताचा आहे हे समजणे कठीण आहे. तेथील भागात भारत व चिनी सैनिकांना शस्त्रास्त्र घेऊन जाण्यास मनाई आहे. या भागात अनेकदा आपले सैनिकही पलीकडे जातात व त्यांचे सैनिकही आपल्या भागात येतात व चर्चेतून प्रश्न सोडविण्यात येतो, असे रावत म्हणाले.

चिनी सैनिकांनी उत्तराखंड सीमावर्ती भागातील मेंढपाळांना परिसर सोडण्यास सांगितल्याच्या वृत्ताकडे रावत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, या परिसरापासून मानवी वस्ती बरीच दूर आहे. भारतीय सेना कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास सक्षम आहे. चीनने धमक्या देऊ देऊ नये.

शेतक ऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण उत्तराखंडमध्ये कमी आहे. ज्या काही आत्महत्या झाल्या आहेत, त्याबाबत चौकशी केली जात असल्याचे रावत म्हणाले.

सरसंघचालकांशी दीड तास चर्चा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली व त्यांच्याशी दीड तास बंदद्वार चर्चा केली. उत्तराखंडमधील द्रुतगती महामार्गाच्या कामातील गैरव्यवहाराच्या मुद्दावरून सिंह आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यातील वादाची पाश्र्वभूमी या भेटीमागे असल्याची माहिती आहे. त्रिवेंद्रसिंह आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास नागपुरात दाखल झाले. तेथून ते कॅन्सर इस्पितळाला भेट दिल्यानंतर त्यांनी विश्रांती घेतली व नंतर ते संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भेटीला गेले. तेथे या दोन नेत्यांत तब्बल दीड तास बंदव्दार चर्चा झाली. सरसंघचालकांची भेट घेण्यासाठी आपण आलो होतो, असे रावत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले असले तरी या भेटीमागे गडकरी-सिंह यांच्यातील वादाची पाश्र्वभूमी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता मोठा करण्याचे काम हाती घेतले होते. या कामात कोटय़वधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप सिंग यांनी केला होता. या मुद्यावरून नितीन गडकरी आणि त्रिवेंद्रसिंग यांच्यात वाद झाला होता. त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मात्र, गडकरींनी त्यांचे सर्व आरोप फेटाळले होते. त्रिवेद्रसिंग यांनी सोमवारी नागपूर भेटीत सरसंघचालकांशी या विषयावर चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.