नागपूर : राज्यात एकीकडे तापमान वाढल्याने विजेची मागणीही वाढली आहे. तर दुसरीकडे महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील ६६० मेगावॉटचा संच क्रमांक ८ तांत्रिक कारणाने (४ मे) बंद पडला आहे. परिणामी, राज्यातील वीज निर्मितीचा टक्का घसरला आहे.

राज्यातील काही भागात आता उन्हाचा प्रकोप सुरू झाला आहे. उकाड्यामुळे सर्वत्र पंखे, वातानुकुलीत यंत्रासह विद्युत उपकरणांचा वापर वाढला. तर कृषीपंपांचाही वापर आता वाढत आहे. राज्यात विजेची मागणी वाढत असतांनाच कोराडीतील ६६० मेगावॉटचा संच क्रमांक ८ बॉयलर ट्यूब लिकेजमुळे ४ मे रोजी बंद पडला. संच बंद पडल्याने येथील वीज निर्मिती सुमारे ६०० मेगावॉटने कमी झाली. त्यामुळे रोजच्या १ हजार ९०० मेगावॉट ऐवजी सध्या येथे १ हजार ३१२ मेगावॉटच वीज निर्मिती होत आहे.

हेही वाचा……तर नीटच्या परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही, ही खबरदारी घ्या

संच दुरूस्तीला आणखी काही दिवस लागणार आहेत. राज्यात शनिवारी विजेची मागणी सुमारे २८ हजार मेगावॉटच्या जवळपास होती. त्यापैकी २३ हजार मेगावॉटची मागणी फक्त महावितरणची होती. मुंबईचीही मागणी ३,५०० ते ४ हजार मेगावॉटच्या जवळपास होती. दोन दिवसांत हा संच सुरू होणार असल्याचा दावा कोराडी केंद्राचे मुख्य अभियंता विलास मोटघरे यांनी केला तर महावितरणच्या जनसंपर्क विभागाने गरजेनुसार वीज उपलब्ध असल्याचे सांगितले.

हेही वाचा…नागपूर जिल्ह्यात सलग दोन दिवस भूकंपाचे धक्के, कारण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वाधिक वीज निर्मिती महानिर्मितीकडून

राज्यात शनिवारी दुपारी ३ वा. सर्वाधिक ८ हजार १०२ मेगावॉट वीज निर्मिती महानिर्मितीकडून होत होती. त्यात औष्णिक विद्युत प्रकल्पांतून ७ हजार ५१४ मेगावॉट, उरन गॅस प्रकल्पातून २६७ मे. वॉ., कोयना जलविद्युत प्रकल्पातून २५५ मे. वॉ., सौरऊर्जा प्रकल्पातून ६० मे. वॉ.चा समावेश होता. खासगी प्रकल्पांपैकी अदानीकडून २,६२४ मे. वॉ., जिंदलकडून १,०६९ मे. वॉ., आयडियलकडून १६४ मे. वॉ., रतन इंडियाकडून १,३४७ मे. वॉ., एसडब्लूपीजीएलकडून ४४५ मे. वॉ. वीज निर्मित होत होती. केंद्राच्या वाट्यातून राज्याला ९,५९१ मेगावॉट वीज मिळाली.