गडचिरोली : सामान्य रुग्णांसह गर्भवती महिलांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात अडचणी येतात, ही बाब दक्षिण गडचिरोलीत पावसाळ्याच्या दिवसांत नेहमीच निदर्शनास येते. असाच प्रकार कोरची तालुक्यातही ३ ऑगस्ट रोजी घडला. एका गर्भवती महिलेला चरवीदंड येथून खाटेची कावड करून पुराच्या पाण्यातून आणि जंगलातील पायवाटेने दोन किलोमीटरपर्यंत लेकुरबोडी गावापर्यंत न्यावे लागले. गर्भवती महिला कशीबशी जिल्हा रुग्णालयात पोहोचली; पण प्रसूतीनंतर बाळ दगावले.

कोरची तालुका मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चरवीदंड येथील रोशनी श्यामराव कमरो या २३ वर्षीय महिलेला शनिवारी रोजी प्रसूतीकळा सुरू झाल्या. याचवेळी चरवीदंड ते लेकुरबोडी गावादरम्यानच्या नाल्याला पूर आला होता. या पुरातून मार्ग काढण्यासाठी रोशनीच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने खाटेची कावड बनवून तिला लेकुरबोडीपर्यंत नेले. तेथून खासगी वाहनाने कोरचीला जाऊन सकाळी ७ वाजता ग्रामीण रुग्णालयात भरती केले. मात्र, डॉक्टरांनी तिला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. अडचणींचा हा प्रवास येथेच थांबला नाही. रुग्णवाहिकेद्वारे तिला गडचिरोलीला हलवण्यात येत होते. मात्र, बेळगाव-पुराडादरम्यान घाटमाथ्यावरच्या रस्त्यावरच बिघाड झालेले दोन ट्रक उभे होते. वाहतूक खोळंबल्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा होत्या. असा कठीण प्रवास करत महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचली; पण प्रसूती होताच काही तासांतच तिचे बाळ दगावले.

हेही वाचा…अमरावती : ‘बच्‍चू कडूंनी उमेदवार मागे घेण्‍यासाठी पैसे मागितले’, आमदार रवी राणांच्या आरोपाने खळबळ

रुग्णवाहिकेसाठी अर्धा किमी पायपीट

बेळगाव-पुराडा घाटादरम्यान ट्रकांच्या रांगा लागल्या असताना रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी वेळीच सतर्कता बाळगून २५ किलोमीटर अंतरावरील कुरखेडा येथून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावली. काही वेळाने रुग्णवाहिका आली. दोन रुग्णवाहिका दोन टोकावर होत्या. तेव्हा ती गरोदर महिला अर्धा किलोमीटरची पायपीट करीत रुग्णवाहिकेपर्यंत गेली. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दिशेने रुग्णवाहिका रवाना झाली; परंतु प्रयत्न अपयशी ठरले.

डॉक्टरांचा मुख्यालयाला ‘खो’

चरवीदंडपासून दोन किलोमीटर अंतरावरील लेकुरबोडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून तेथे डॉ. राहुल कापगते आणि आरोग्यसेविका माधुरी कामडी आहेत. तसेच ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेझरी येथे मानसेवी डॉक्टर डॉ. ज्ञानदीप नखाते, डॉ. नेहा मेश्राम, आरोग्यसेविका संगीता गडवाल कार्यरत आहेत; परंतु हे डॉक्टर मुख्यालयी राहत नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.

हेही वाचा…अकोला : फुकटचे डिझेल लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड! काय आहे प्रकार जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे काय?

कोरची तालुक्यातील सर्व गरोदर महिलांची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते. चरवीदंड (केरामी टोला) येथील गरोदर महिला रोशनी कमरो हिला २ ऑगस्ट रोजी कोरची ग्रामीण रुग्णालयात संदर्भित केले; पण ती गेली नाही. सातव्या महिन्यातच तिची प्रसूती झाली, कोरचीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी यांचे म्हणणे आहे.