लोकसत्ता टीम

नागपूर: ‘सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी महायुती सरकारने पाच हजार रुपयांची स्वतंत्र मदत दिली. आता सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात येईल’, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या घोषणेने संकटात सापडलेल्या विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीपूर्वी येणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनची लागवड शेतकरी करतो.

विदर्भ, मराठवाड्यात सोयाबीनचे अधिक उत्पादन होते. विदर्भाचा विचार करता वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील काही भागात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. एकट्या पश्चिम विदर्भात ७१ अब्ज रुपयांहून अधिकचे सोयाबीनचे उत्पादन होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या शेतकऱ्यांना आधार म्हणून महायुती सरकारने पूर्वी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजनेची घोषणा केली. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार, असे वचन दिले.

आणखी वाचा-“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप

यावरून शेतकरी आनंदी असतानाच आता सोयाबीनला सहा हजार रुपयांचा हमीभाव देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केल्याने सोयाबीन उत्पादकांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. त्यांच्यात उत्साह दिसू लागला आहे. मुळात दिवाळी आणि नंतरच्या दिवसांतील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था साधारणत: सोयाबीनच्या उलाढालीवर होत असते. नेमक्या याच पिकासाठी दिलासादायी घोषणा होत असल्याने समाधान व्यक्त होऊ लागला असल्याची माहिती बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने दिली.

आणखी वाचा-रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाजारात नवचैतन्य

आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजना आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा हजार रुपयांचा हमीभाव देण्याची घोषणा केल्याने बाजारातही नवचैतन्य आले आहे. दिवाळीच्या दिवसांतच हे घडल्याने शेतकऱ्यांसोबतच व्यापारीही या घोषणांच्या अनुषंगाने नियोजन करू लागला आहे. सरकारी दरासोबतच खुल्या बाजारातही सोयाबीनला अधिक दर मिळण्याची चिन्हे यानिमित्ताने असल्याचे सूत्रांनी सांगितले.