राज्याच्या अधिसूचित आजारांत समावेश
राज्यात डेंग्यूचा ‘अधिसूचित आजारां’च्या यादीत समावेश करण्यात आला असून यापुढे शासकीय वैद्यकीय संस्थांसह खाजगी डॉक्टरांना डेंग्यूग्रस्तांच्या नोंदी ठेवणे कायद्याने बंधनकारक झाले आहे. तसे परिपत्रक राज्याच्या आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले.
डेंग्यू हा गंभीर आजार असून त्याचा प्रकोप झाल्यावर रुग्णांना मृत्यूचा धोका अधिक आहे. सन २०१२ मध्ये राज्यात डेंग्यूची साथ आली होती. राज्यभरात तीन हजारांवर डेंग्यूग्रस्तांची नोंद झाली होती. एकटय़ा मुंबईत साडेसातशेवर नोंद झाल्यामुळे डेंग्यूचा समावेश अधिसूचित आजारांच्या यादीत करण्याची व त्यासंबंधीचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्याची मागणी पुढे आली होती. हेल्प मुंबई फाऊंडेशनच्यावतीने वरुणा खन्ना यांनी ही याचिका केली आहे. चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचे निधन डेंग्यूमुळे झाल्याचे निष्पन्न होताच राज्याच्या आरोग्य यंत्रणेमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या घडनेमुळे राज्यभरात डेंग्यूबाबत नागरिकांत दहशत निर्माण झाली होती.
शासकीय आरोग्य यंत्रणा डेंग्यूच्या नोंदी घेत होती. पण, खासगी रुग्णालयांवर यासंदर्भात कोणतेही बंधन नव्हते. परंतु केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ९ जून रोजी डेंग्यूचा अधिसूचित आजारांच्या यादीत समावेश करण्याचे आदेश जारी केले. यामुळे महानगर पालिका, सार्वजनिक आरोग्य सेवा तसेच खासगी रुग्णालयांत उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरही डेंग्यूग्रस्तांची नोंद घ्यावी लागणार आहे. डेंग्यूग्रस्तांची आकडेवारी शहरात नगरपालिकेके जिल्हा शल्यचिकित्सकांच्याकडे तर महानगरात महापालिकांच्या आरोग्य विभागाकडे तर गावखेडय़ात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे डेंग्यूच्या रुग्णांची नोंद करावी लागणार आहे.

जनजागृती सुरू
आरोग्य विभागाकडून हिवताप नियंत्रणाकरिता १ ते ३० जूनदरम्यान जनजागरण अभियान राबवण्यात आले. त्याच धर्तीवर डेंग्यूबाबत १ जुलैपासून ३० जुलैपर्यंत जनजागृती करण्यात येत आहे. डेंग्यूला अधिसूचित आजारांच्या यादीत समावेश करण्यात आल्याने खासगी वैद्यक क्षेत्राला डेंग्यूग्रस्तांची माहिती आरोग्य विभागाला सादर करावी लागणार आहे.
– डॉ. मिलिंद गणवीर
सहायक संचालक (हिवताप), आरोग्य सेवा, नागपूर विभाग

डेंग्यूग्रस्तांचे अचूक आकडे पुढे येणार
डेंग्यूचा समावेश अधिसूचित आजारांच्या यादीत करण्यात आल्यामुळे या आजाचारी नेमकी आकडेवारी समोर येणार आहे. याशिवाय औषधविक्रेत्यांपासून खासगी रुग्णालये, डॉक्टर आदी सगळ्यांना डेंग्यूची आकडेवारी व रुग्णांची तपशीलवार माहिती नगरपालिका, महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य विभागाला देणे बंधनकारक असेल.