‘मनसे नेते राज ठाकरे हे लोकप्रिय नेते व वक्ते आहेत. त्यांच्या पक्षाचा झेंडयावर निळा व भगवा रंग होता. मात्र, नंतर त्यांनी तो बदलला. अशाच पध्दतीने ते कायम भूमिका बदलतात. मराठी माणसाने सर्वधमिंयांबद्दल मानवतावादी भूमिका घेतली पाहिजे. परंतु, ठाकरे हे वाद वाढवितात. उत्तर व दक्षिण भारतीयांचा, मुस्लीमांचा विरोध करतात. त्यामुळेच केवळ दोन मिनिटांच्या अजानसाठी त्यांनी भोंग्याचे राजकारण उकरून काढले.ते आपणास अमान्य असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर केली.

हेही वाचा- शहरातील रस्त्यांवर बांधकाम साहित्याचे ढिगारे; अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा

६६व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनासाठी ते नागपूर येथे आले असता ते पत्रपरिषदेत बोलत होते. बदलत्या रंगाप्रमाणे ठाकरेंना सर्वधमिंयांनाही जोडता आले नाही. त्यांनी जाणीवपुर्वक भोंगे बंद झाले पाहिजे असा आग्रह धरला. हिंदूंचे सण असोत की भीमजयंती वा इतर उत्सव. सर्वांच्या उत्सवात भोंग्याचा वापर होतो. त्यामुळे उत्सवांबद्दल मानवतावादी भूमिका असली पाहिजे. ते भाषण करणारे नेते असले तरी वाद लावणारे नेते आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
केंद्रातील मोदी सरकारच्या कामगिरीचे कौतुक करताना आठवले यांनी महागाईच्या मुद्यावरही त्यांनी मिळमिळीत उत्तरे दिली. आपण भाजपचे प्रवक्ता आहात का? या प्रश्नावर त्यांनी एनडीएचा घटक व मोदी सरकारमध्ये मंत्री असल्याने भाजपबद्दल बोलत असल्याचे सांगितले. पीएफआयवरील बंदीचे समर्थन केले तर संघ राष्ट्रवादाचे काम करीत असल्याचे प्रमाणपत्र दिले.

हेही वाचा- वाशिम : शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून ५० ‘एसटी बसेस’ जाणार , प्रवाशांना मात्र मन:स्ताप

मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा शिवसेनेचा पराभव होईल, असे भाकित वर्तवताना २२७ वॉर्डपैकी १५० जागा भाजप-शिंदे युती जिंकेल असा दावा केला. सत्ता मिळविण्यासाठी राजकारण ‘रिपाईंने एकत्र यायला हवे. असे झाल्यास पक्षाची ताकद वाढेल. सत्तेसाठी इतर पक्षाची साथ घ्यावी लागेल. रिपाई एकसंघ होऊन भाजपसोबत गेल्यास सत्तेचा वाटा मिळेल. किंबहूना, सत्ता मिळविण्यासाठीच राजकारण करावे’ असे आपले ठाम मत असल्याचे आठवले म्हणाले.