पहिल्या शंभर विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांच्या यादीत यंदाही समावेश नाही
नागपूर : अंतर्गत राजकारणात धन्यता मानणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पहिल्या शंभर विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांच्या यादीत यंदाही समावेश नाही. याउलट मागील वर्षी १४३व्या क्रमांकावर असलेल्या नागपूर विद्यापीठाचे मानांकन १९६ क्रमांकावर घसरले असून ‘रँकबॅड’च्या यादीत आले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून ‘नॅशनल इन्स्टिटय़ूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ जाहीर करण्यात आले. यात अभियांत्रिकी संस्थांमध्ये सर विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेने (व्हीएनआयटी) पाच नामवंत संस्थांना मागे टाकून २७ व्या स्थानावर झेप घेतली आहे.
दरवर्षी देशभरातील विद्यापीठ, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी, वैद्यकीय, फार्मसी आणि विधी शाखेतील महाविद्यालयांचे मानांकन करण्यात येते. विद्यापीठ आणि महाविद्यालयांची गुणवत्ता तपासून हे मानांकन ठरवण्यात येते. गेल्या चार वर्षांपासून पहिल्या दोनशे महाविद्यालय, विद्यालयांचा समावेश त्यात केला जातो. प्रथमच सहभागी झालेल्या आयआयएम नागपूरला ४० वे स्थान मिळालेले आहे.
याशिवाय फार्मसी महाविद्यालयांमध्ये नागपूर विद्यापीठाच्या औषधनिर्माणशास्त्र विभागाने ३३ वे स्थान पटकावले. याशिवाय फार्मसी महाविद्यालयामध्ये कामठीच्या किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसीने ५९ वरुन अकरा महाविद्यालयांना मागे टाकत ४८ व्या स्थानावर झेप घेतली आहे. अभियांत्रिकीमध्ये रामदेवबाबा ११३, जी.एच. रायसोनी आणि यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाने संयुक्तरित्या १३९ वे स्थान पटकावले आहे. विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाने १४४ वे स्थान मिळवले आहे. वैद्यकीय संस्थांमध्ये दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाने ९२ स्थानावरुन थेट २९ व्या स्थानावर झेप घेतली आहे. तसेच दंत अभ्यासक्रमात विद्यापीठ १४ व्या क्रमांकावर आहे.