गडचिरोली : धान बोनस वाटपात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी चामोर्शी खरेदी विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग (पणन) अधिकाऱ्यांना वरील निर्देश दिले. त्यामुळे चामोर्शी खरेदी विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
गेल्या काही वर्षांपासून धान खरेदी, भरडाई घोटाळा, तांदूळ तस्करी यासारख्या प्रकारामुळे शासनाला कोट्यवधींचा फटका बसत आहे. अशातच आता धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसमध्ये देखील कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या घोटाळ्यासंदर्भात दस्तऐवज सादर करून चौकशीची मागणी केली होती. पिपरे यांनी तक्रारीत केलेल्या दाव्यानुसार, चामोर्शी तालुका खरेदी विक्री संघाने भूमिहीन व्यक्तींच्या नावे शेती दाखवून त्यांच्या खात्यावर प्रत्येकी ४० हजार रुपये जमा केले. त्यानंतर संबंधित व्यक्तींना दोन ते तीन हजार देऊन उर्वरित रक्कम इतरत्र वळती करण्यात आली.
याप्रकरणी काही बोगस लाभार्थ्यांचे खाते तपासले असता हा प्रकार उघडकीस आला. अशा प्रकारच्या बोगस लाभार्थ्यांची यादीच तक्रारीत देण्यात आली. यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नव्हती. अखेर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती.
या समितीने दिलेल्या अहवालात प्रथमदर्शनी धान बोनस वाटपात अनियमितता झाल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी गडचिरोली यांना चामोर्शी खरेदी विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.
जिल्हा मार्केटिंग अधिकारीही अडचणीत
या घोटाळ्याप्रकरणी वारंवार तक्रार मिळुनही कारवाई न करणारे जिल्हा मार्केटिंग अधिकारी विश्वनाथ तिवाडे आणि संबंधित अधिकाऱ्यांना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बाजावून खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे याप्रकरणात अधिकारी अडचणीत येऊ शकतात. विशेष म्हणजे या प्रकरणात तिवाडे यांचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार बोनस वाटपात प्राथमिकदृष्ट्या अनियमितता झाल्याचे दिसून येते. त्यानुसार संबंधित खरेदी विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.- अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी