नागपूर : कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी राज्यातील पोलीस दल अहोरात्र झटत असते.उन्हं, वारा, पाऊस, नैसर्गिक आपत्ती अशा कोणत्याही संकटाची पर्वा न करता हे पोलीस अहोरात्र सेवेत तत्पर असतात. त्यांच्या कर्तव्य निष्ठेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कर्मठ जवानांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले जाते.
नागपूरसाठी अशीच अभिमानाची बाब नुकतीच घडली. पोलीस दलातील कर्तव्यदक्ष निवृत्त माजी हवालदार अविनाश जनार्दन अक्कावार यांना नुकतेच उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी गुरुवारी २६ जूनला मुंबईत झालेल्या सोहोळ्यात त्यांचा या पुरस्काराने गौरव करीत शहराच्या मानात भर घातली.
पोलीस दलातून ३८ वर्षे निष्ठा आणि प्रामाणिकपणाने सेवा करणारे अविनाश अक्कावार यांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला १५ ऑगस्ट २०२२ मध्ये हा राष्ट्रपती पदकाचा सन्मान जाहिर झाला होता. गुरुवारी त्याचे राज्यपालांच्या हस्ते त्यांना तो प्रदान करण्यात आला.हुडकेश्वर येथील चंदनशेष नगर येथील रहिवासी अविनाश अक्कवार १९८६ मध्ये नागपूर पोलिस दलात हवालदार म्हणून रुजू झाले. आपल्या कार्यकाळात त्यांनी सीताबर्डी, कोतवाली, कळमना पोलिस ठाणे, गुन्हे शाखा आणि एनडीपीएस सेलमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. २०१८ मध्ये त्यांना डीजी इन्सिग्निया पदकही मिळाले आहे. अक्कावार हे २०२४ मध्ये उच्च न्यायालयाच्या नोडल ऑफिसर म्हणून पीएसआय पदावरून निवृत्त झाले आहेत.
कर्तव्यदक्ष हवालदार ते राष्ट्रपती पदक
केवळ त्यांच्या कुटुंबियांनाच नाही तर त्यांच्या सहकाऱ्यांना आणि परिचितांनाही त्यांच्या यशाचा अभिमान आहे. शनिवारी ते घरी परतले तेव्हा त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. अविनाश यांनी आपल्या यशाचे श्रेय शहराचे तत्कालिन पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय आणि सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेला दिले आहे. कर्तव्यदक्ष हवालदार ते राष्ट्रपती पदक मिळवण्यापर्यंतचा त्याचा प्रवास पोलीस दलातील अन्य जवानांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.