लसीकरण केंद्रांवरील कर्मचाऱ्यांचा सवाल; विविध निर्बंधांमुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्या रोडावली
नागपूर : शहरातील अनेक केंद्रांवर करोनाची लस उपलब्ध असून प्रशासनाने लस घेण्यासाठी लावलेल्या विविध अटींमुळे आता अनेक लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांची संख्या रोडावली असून अनेक केंद्र दुपारनंतर ओसाड दिसू लागले आहेत. ज्येष्ठ नागरिक नाही तर लस देणार कोणाला, असा प्रश्न केंद्रावरील कर्मचारी उपस्थित करू लागले आहेत.
गेल्या काही दिवसात लस उपलब्ध नसल्यामुळे राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने लसीकरणाबाबत अनेक अटी लावल्या. राज्य शासनाचे निर्देशानुसार ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना लसीची पहिली व दुसरी मात्रा दिली जात आहे. तरी अटींमुळे दुपारनंतर लस घेण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या कमी झाली आहे. राज्य शासनाने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे जाहीर केल्यानंतर शहरात केवळ ११ हजार १४१ नागरिकांना लस देण्यात आली. मात्र त्यानंतर लसीचा निर्माण झालेला तुटवडा बघता या वयोगटाचे लसीकरण बंद करण्यात आले.
४५ वर्षांवरील नागरिकांनी पहिली मात्रा घेतल्यानंतर दुसरी मात्रा घेण्यासाठी ८५ दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला. करोनाच्या काळात फ्रंटलाईन वर्कर्सना लस देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता केवळ ४५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीची पहिली व दुसरी मात्रा दिली जात आहे. आतापर्यंत ४५ वर्षांवरील ४ लाख ६८ हजार १५५ लोकांनी लसीची पहिली मात्रा तर ६ लाख ३८ हजार २५५ लोकांनी दुसरी मात्रा घेतली आहे.
लसीची दुसरी मात्रा घेण्यासाठी अनेक लोक ४५ दिवसानंतर लसीकरण केंद्रावर येतात त्यांना आता ८५ दिवसानंतर या असे सांगितले जाते. यामुळे केंद्रावरील गर्दी कमी झाली आहे. नंदनवन भागातील एका लसीकरण केंद्रावर दुपारनंतर ६० ते ७० लोकांना लस देण्याची सोय असताना केवळ २ ज्येष्ठ नागरिक केंद्रावर आले. एका इंजेक्शनमधून १० लोकांना लस देता येत असल्यामुळे किमान १० लोक उपस्थित असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे.
गंजीपेठ, ईश्वरनगर, शिवमंदिर समाजभवन नंदनवन, दुर्गानगर शाळा, शारदा चौक, जुना सुभेदार, सरस्वती शाळा (टिमकी) बजेरिया, हंसापुरी आयुर्वेदिक, हंसापुरी, म्हाळगीनगर शाळा, म्हाळगीनगर या ठिकाणी सकाळी काही ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी दिसतात. दुपानंतर मात्र ही केंद्रेओसाड असल्याचे दिसून आले.
दरम्यान, फ्रंटलाईन वर्करचे महापालिकेने बंद केलेले लसीकरण सुरू केल्यास करोनाच्या काळात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना लसीची मात्रा घेता येऊ शकते, अशी मागणी नगरसेवकांकडून केली जात आहे. मात्र त्यासाठी महापालिका प्रशासन मंजुरी देत नाही.
पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण
अनेक ज्येष्ठ नागरिकांना लस मिळालेली नसल्याने उपराजधानीच्या पोलिसांनी त्यांच्याकडे नोंदणी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे पोलीस रुग्णालयातून लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमातून पोलिसांनी माणुसकीचा संदेश दिला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस दफ्तरी सध्या पाच हजार ७८५ ज्येष्ठ नागरिकांची नोंद आहे. त्यापैकी २१२ नागरिक एकटे राहतात. या नागरिकांनी लस घेतली किंवा नाही, याची माहिती संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी घेत आहेत. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना पोलिस रुग्णालयात लस देण्यात येईल. दामिनी पथक पोलिसांच्या वाहनाने ज्येष्ठ नागरिकांना रूग्णालयात आणण्यात येत आहे. लस घेतल्यानंतर त्यांना घरीही पोहोचवण्यातही येत आहे. बुधवारपासून या उपक्रमाला सुरुवात झाली असून संपूर्ण ज्येष्ठांचे लसीकरण होईपर्यंत हा उपक्रम सुरू राहील, अशी माहिती पोलीस अमितेश कुमार यांनी दिली.
‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ला प्रतिसाद नाही
महापालिकेने ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन म्हणून दोन ठिकाणी ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. मात्र त्याला फारसा प्रतिसाद नसल्याचे समोर आले आहे.
लसीचा साठा (२० मे)
कोव्हॅक्सिन – २४००
कोविशिल्ड – १०२०