आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांची माहिती; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूर : आदिवासी समाजातील मुलांना अनेक गोष्टींची गरज आहे. दहावीपर्यंत ते शिक्षण घेतात, पण पुढे काय? वडील निरक्षर असल्यास पुढची दिशा दाखवण्याची, मुलांचे भविष्य घडवण्याची दुहेरी जबाबदारी  शिक्षकांची असते. त्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण आवश्यक आहे आणि त्याचदृष्टीने  शिक्षकांना प्रशिक्षण देण्याकरिता आदिवासी विभागाने पाऊल उचलले आहे. एवढेच नाही तर आदिवासी मुले बोलत नाहीत. त्यांना बोलके करण्यासाठी देखील उपक्रम सुरू करणार आहोत, अशी माहिती आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी दिली.

लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या विशेष भेटीत रवींद्र ठाकरे यांनी आदिवासी विभाग पारदर्शक, अद्ययावत करण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती दिली. विभाग अद्ययावत झाला तर आदिवासींना मूळ प्रवाहात आणणे अधिक सोपे होईल, असे सांगितले. सुमारे २२ अधिकाऱ्यांना क्षमता निर्माण प्रशिक्षण देण्यात आले आहे. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत तर त्याचा उपयोगच होणार नाही आणि म्हणूनच या योजनांचा वापर चांगल्या पद्धतीने कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व विभागाच्या योजना पेनड्राइव्हमध्ये टाकून ते  अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आदिवासी विभागाची धुरा हाती घेतल्यानंतर दुर्गम भागातील शाळा, वसतिगृहांना भेटी दिल्यावर ही मुले शहरी मुलांच्या तुलनेत बरेच मागे असल्याचे जाणवले. त्यांच्या आजूबाजूला जे वातावरण आहे, त्यानुसार पोलीस, वनरक्षक, परिचारक व्हायचे, इथपर्यंतच त्यांचे स्वप्न मर्यादित होते. आपल्यातीलच काही लोक डॉक्टर, अभियंता, विदेशात शास्त्रज्ञ आहेत, याची माहिती त्यांना नव्हती. त्यांना मोठे होण्याचे स्वप्नच दाखवायचे नाही तर त्या स्वप्नांच्यादृष्टीने त्यांचा प्रवास कसा होईल, यासाठी या सर्व उच्चशिक्षित आदिवासींची मदत घेण्यात येत आहे. त्या सर्वाचे मार्गदर्शन या मुलांना मिळण्यास सुरुवात देखील झाली आहे. आदिवासी मुलांना बोलके करण्यासाठी स्थानिक अधिकारी त्यांना मार्गदर्शन करतील. अनेक मुलांचे पालक अशिक्षित असल्याने मोठे आव्हान आहे, पण या सर्व प्रयत्नांमधून हे आव्हान सहजसोपे करण्याचा प्रयत्न आहे. या मुलांना अनेक गोष्टींची आवश्यकता आहे. पुढे काय करायचे हे देखील त्यांना माहिती नाही. त्यासाठी पुण्याची एक संस्था समोर आली आहे. कोिडग ही शहरी आणि इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांची मक्तेदारी राहू नये, तर दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांला देखील कोिडग यावे यासाठी तज्ञांचा समूह केला आहे. प्रामुख्याने व्हीएनआयटीने यासाठी पुढाकार घेतला असून ही तज्ञ मंडळी आदिवासी मुलांना कोिडग शिकवणार आहे, असे रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

अनेक संस्थांकडून सहकार्याचा हात

आदिवासी विभाग पारदर्शक करतानाच आदिवासींच्या विविध संस्थांना प्रत्येक टप्प्यावर सोबत ठेवण्याचा प्रयत्न आहे. कारण प्रशासन आणि संस्था यांनी हातात हात घालून काम केले, तरच काम अधिक चांगल्या पद्धतीने होईल. त्यादृष्टीने अनेक संस्थांनी सहकार्याचा हात समोर केला आहे. त्यात खावटी अनुदान योजना, जागतिक आदिवासी दिन, भगवान बिरसा मुंडा जयंती अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.

विभागाकडे पाहण्याची दृष्टी बदलतेय

आदिवासी विभागातील बदली, पदोन्नती, अनुकंपा या विषयांकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होती. ही दृष्टी आता बदललेली दिसेल, कारण रखडलेल्या बदल्या, पदोन्नती, अनुकंपा या वर्षांत सुरळीत पार पडल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव समुपदेशनाद्वारे २६५ बदल्या तसेच विशेष विनंतीने ५७ बदल्या अशा एकूण ३२२ बदल्या वर्ग तीन संवर्गात करण्यात आल्या. वर्ग तीन संवर्गाच्या एकूण १८५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तसेच ३३ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर सामावून घेण्यात आले आहे.