नागपूर : राज्यातील व्याघ्रप्रकल्पातील पर्यटनाची चाके आता येत्या एक जुलैपासून थांबणार आहेत. त्यामुळे जंगलात व्याघ्रदर्शनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची घोर निराशा होणार हे नक्कीच. मात्र, व्याघ्रप्रकल्प प्रशासनाने त्याचवेळी व्याघ्रप्रेमींसाठी एक पर्यायदेखील उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे पर्यटकांना व्याघ्रदर्शनाची संधी नक्कीच आहे.
साधारणपणे १५ जूनपासून पावसाळा संपेपर्यंत व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन बंद करण्यात येते. एक ऑक्टोबरपासून पुन्हा पर्यटनाला सुरुवात होते. काही वर्षांपूर्वीपर्यंत संपूर्ण व्याघ्रप्रकल्प पर्यटनासाठी बंद ठेवला जात होता, पण आता अलीकडच्या काही वर्षांत कोअर क्षेत्र बंद ठेऊन बफर क्षेत्रातील पर्यटन सुरू ठेवले जाते.
पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे वन विभागाने एक जुलैपासून पर्यटकांसाठी जंगल सफारी बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता पर्यटकांना पावसाळा संपेपर्यंत जंगल सफारीसाठी वाट बघावी लागणार आहे. पावसाळ्यात जंगलात वाहने अडकून पडतात. याशिवाय वन्यप्राण्यांचा प्रजनन कालावधी लक्षात घेऊन या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हालचाली अबाधित ठेवण्याकरिता जंगल सफारी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पेंच व्याघ्रप्रकल्प
पेंच व्याघ्र प्रकल्पाचे कोअर क्षेत्र, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-पवनी-कहांडला अभयारण्यात जंगल सफारीची सुविधा एक जुलैपासून पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे, अशी माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. किशोर मानकर यांनी दिली.
मर्यादित सफारी सुविधा
पावसाळ्यात वनविभागाने पेंच, बोर आणि उमरेड-पवनी-कन्हांडलामधील जंगल सफारी बंद केली असली तरी पावसाळ्यात पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पवनी (एकसंघ नियंत्रण) पर्यटन गेट आणि सुरेवानी पर्यटन गेट येथून मर्यादित स्वरूपात जंगल सफारीची सुविधा ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध करण्यात आली आहे.
ताडोबा व्याघ्रप्रकल्प
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची कोरमधील सफारी एक जुलैपासून बंद होणार आहे. पावसाळ्यामुळे दरवर्षी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापन हा निर्णय घेतात. मात्र ताडोबा अंधारी प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रालगत असलेले बफर क्षेत्र सफारीसाठी खुले राहणार आहे.
नवेगाव-नागझिरा, मेळघाट
नवेगाव-नागझिरा आणि मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील पर्यटनाची चाके देखील एक जुलै पासून बंद झाली आहेत आणि एक ऑक्टोबरलाच आता थेट पर्यटनाचे दरवाजे उघडतील.