हैदराबाद येथून यवतमाळकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्समधील एका डॉक्टर तरुणीचा ट्रॅव्हल्स चालकाने विनयभंग केला. ही घटना यवतमाळ शहरातील बसस्थानक चौकात आज मंगळवारी घडली. यावेळी संतप्त नगारिकांनी या चालकाला चोप देत अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. असद खान अशरफ अली खान (४०) (रा. पुराणी अबादी, बेला मंडळ जि. अदिलाबाद) असे आरोपी चालकाचे नाव आहे.
शहरातील एक डॉक्टर तरुणी येथील खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करीत आहे. काही कामानिमित्त ती हैदराबाद येथे गेली होती. सोमवारी ती तरुणी तिच्या मोठ्या बहिणीसह हैदराबाद येथून यवतमाळकडे येण्याकरिता ट्रॅव्हल्सने रात्री १० वाजताच्या सुमारास निघाली. दरम्यान, मंगळवारी सकाळी ही ट्रॅव्हल्स यवतमाळ येथील जुने बसस्थानक चौकात पोहचली. यावेळी ट्रॅव्हल्समधील दुय्यम चालकाने यवतमाळ आल्याचा आवाज प्रवाशांना दिला. यावेळी डॉक्टर तरुणी आणि तिची मोठी बहीण दोघीही ट्रॅव्हल्समधून बाहेर उतरण्याची तयारी करीत असताना आवाज देणाऱ्या चालकाने त्या दोघींकडे येऊन अश्लील लज्जास्पद कृत्य केले.
यावेळी डॉक्टर तरुणीसह तिच्या बहिणीने आरडओरड केली. तेव्हा प्रवाशांसह नागरिकांनी धाव घेत दोघींची विचारपूस केली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्या चालकाला चोप देत अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून आरोपीला अटक केली.