गोंदिया : यंदा कधी नव्हे ते मे महिन्यातच पावसाचे आगमन झाले. खरे तर मे महिना हा अत्यंत तप्त उन्हाचा असतो. मात्र, यंदा मे महिन्यातच जिल्ह्यात पावसाने जोर धरला. त्यामुळे उन्हाळ्यातील भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी, बाजारपेठेत भाज्यांचे दर वाढले आहेत.
गोंदिया जिल्ह्यात ही भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जाते. पण या सोबतच शेजारील भंडारा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळसह अन्य जिल्हे व इतर राज्यांतूनही येथे भाजीपाला आयात केला जातो. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने भाजीपाल्याची आता टंचाई निर्माण झाली आहे. अन्य जिल्ह्यांतून, राज्यातून येणाऱ्या भाजीपाल्याला ब्रेक लागला आहे.
त्यामुळे जो भाजीपाला येत आहे, तो घाऊक बाजारात महागड्या दरात ग्राहकांना विकला जात आहे. एकंदरीत कमी दरात शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करून व्यापारी ते जादा दरात लहान विक्रेत्यांना विकत आहेत. हे विक्रेते देखील आपली मर्जीने त्यापेक्षा अधिक दराने ग्राहकांना भाजीपाला विकत आहेत. ठोक बाजार पेठेतच भाजीपाल्याचे दर वाढल्याने भाजीपाला महाग विकावा लागत असल्याचे स्थानिक भाजीपाला विक्रेते सांगत आहेत.
यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे. अवकाळी पावसामुळे अचानक वाढलेल्या भाजीपाल्याच्या घरामुळे गृहिणींचे बजेट ही
कोलमडले आहे.
अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र या दरम्यान काही व्यापारी शितगृहात साठवून ठेवलेला किंवा शेतकऱ्यांकडून कमी दरात खरेदी करून त्याला जादा दराने त्याची विक्री करीत आहेत. या भाववाढीचा फायदा केवळ व्यापाऱ्यांना होत आहे. मात्र शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच आहे.
भाजीपाला विक्री करून त्या पैशातून शेतीचा हंगाम साधायचा होता. मात्र, अवकाळी पावसाने चांगलेच नुकसान केले आहे.-गणेश कोकोडे, भाजीपाला उत्पादक उमरी
भाजीपाला पिकविण्यासाठी सहा महिने मेहनत करावी लागते. मात्र, अवकाळी पावसाने या कष्टावर पाणी फेरले. शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.-कुसन झोडे, भाजीपाला उत्पादक, खजरी
भाजीपाला हा कच्चा माल असतो त्यामुळे आवक कमी झाली की दर वाढणार हा नियम भाजी बाजारात ही लागू होतो.-राजू नागरिकर अध्यक्ष,भाजी विक्रेते संघटना गोंदिया
आजचा भाजीपाला भाव
( प्रति किलो)
मेथी- १२०
कांदा- ३०
लसूण-१६०
पालक-८०
गाजर -८०
टोमॅटो -३०/४०
कोबी – ५०
फुलकोबी – ६०
मिरची – ६०
दुधी भोपळा -४०
अद्रक(आले)- ८०
भेंडी – ६०
गवारशेंग – १२०
चवळी -६०
वांगी – ६०
लिंबू – ८०
कोथिंबीर -८०/१००