लोकसत्‍ता टीम

अमरावती : महाराष्‍ट्रातील विधानसभा निवडणुकीत दोन आघाड्या समोरासमोर आहे. प्रामाणिक मूल्‍यांच्‍या आणि मुद्यांच्‍या आधारे महायुतीने विकासाचा आराखडा आपल्‍यासमोर मांडला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी आहे. या आघाडीला राष्‍ट्रधर्म ठाऊक नाही, संत-महापुरूषांच्‍या विचारांशी घेणे-देणे नाही. युवकांच्‍या भविष्‍याची, बहिणींच्‍या सुरक्षेची चिंता नाही. काँग्रेस पक्षाकडून तर अपेक्षाच ठेवू नये. ही महाविकास नव्‍हे, तर महाअनाडी आघाडी आहे, अशी टीका उत्‍तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी गुरूकूंज मोझरी येथे प्रचारसभेत बोलताना केली.

तिवसा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राजेश वानखडे यांच्‍या प्रचारार्थ योगी आदित्‍यनाथ यांच्‍या सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. योगी आदित्‍यनाथ म्‍हणाले, काँग्रेसच्‍या नेत्‍यांचे चरित्र सर्वांना माहिती आहे. याच काँग्रेसने राष्‍ट्रहिताच्‍या मूल्‍यांसोबत खेळण्‍याचे काम केले आहे. जेव्‍हा देशासमोर संकट निर्माण होते, तेव्‍हा काँग्रेसचे नेते विदेशात सहलीसाठी जातात.

आणखी वाचा-“विरोधकांच्या महा‘अडाणी’ आघाडीला देश व धर्माची…” वाशीममध्ये कडाडले योगी आदित्यनाथ

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे इटलीला निघून जातात. भारताबाहेर जाऊन आपल्‍या देशाविषयी अपमानजनक वक्‍तव्‍य करतात. अयोध्‍येत राम मंदिर उभारले जाऊ नये, यासाठी काँग्रेसनेच अडथळे उभे केले होते. देशात दहशतवादाची सुरूवात काँग्रेसच्‍याच काळात झाली. जम्‍मू काश्मिरात ३७० वे कलम बळजबरीने लागू करण्‍याचे काम काँग्रेसच्‍या त्‍यावेळच्‍या नेतृत्‍वाने केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्‍याला विरोध केला होता. अनुसूचित जाती, जमातींना आरक्षण मिळू नये, यासाठी षडयंत्र रचण्‍याचे काम काँग्रेसनेच केले, असा आरोप योगी आदित्‍यनाथ यांनी केला.

आणखी वाचा-जातीय जनगणनेची गोष्ट करताच मोदींची झोप उडाली… आता कितीही अडवण्याचा…राहुल गांधींच्या वक्तव्याने…

योगी आदित्‍यनाथ म्‍हणाले, देशात आंतकवाद, नक्षलवाद पसरविण्‍यासाठी काँग्रेसची धोरणे कारणीभूत ठरली आहेत. काँग्रेसजवळ कुठलीही मूल्‍ये, आदर्श नाहीत. भविष्‍याच्‍या योजना नाहीत. सत्‍ता ही त्‍यांच्‍यासाठी भ्रष्‍टाचाराचे एक माध्‍यम ठरले आहे. त्‍यांना देशात अराजकता पसरवून सत्‍ता मिळवायची आहे. पण, त्‍यांची इच्‍छा कधीच पूर्ण होणार नाही. श्रीराम आणि श्रीकृष्‍णाचे अस्तित्‍व नाकारणाऱ्या काँग्रेसच्‍या लोकांना आता देव आठवायला लागले आहे.

योगी आदित्‍यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा दिला. ते म्‍हणाले. आम्‍ही सर्व जण एकत्र राहू, तेव्‍हाच सुरक्षित राहू. हिंदूंच्‍या धार्मिक मिरवणुकांवर दगडफेक करणाऱ्यांना धडा शिकवण्‍याची गरज आहे. ते आता मिरवणुकांवर दगड फेकणार नाहीत, तर मिरवणुकीच्‍या समोर झाडू घेऊन रस्‍त्‍याची सफाई करताना दिसतील.

आणखी वाचा-चंद्रपूर : बंडखोर पाझारे, अली, वारजूकर, गायकवाड यांची भाजपातून हकालपट्टी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सभेला भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, तिवसाचे भाजपचे उमेदवार राजेश वानखडे, धामणगाव रेल्‍वेचे उमेदवार प्रताप अडसड आणि मोर्शीचे उमेदवार उमेश यावलकर आदी उपस्थित होते.