News Flash

अनधिकृत वादग्रस्त धार्मिक स्थळावर कारवाई

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे काम सुरू आहे.

कारवाईस विरोध करणाऱ्या कैलास मुदलीयारविरुद्ध खंडणीचा गुन्हा

सलग अकरा दिवसांपासून काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत सुरू असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधातील कारवाईला शुक्रवारी वेगळे वळण लागले. शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांमध्ये सर्वाधिक भव्यदिव्य असणारे आणि गवगवा झालेले नाशिकरोड येथील धार्मिक स्थळ शुक्रवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. कधीकाळी माजी मंत्री छगन भुजबळ यांचा निकटवर्तीय म्हणून वावरणारा आणि काही दिवसांपूर्वी भावाला शिवसेनेत प्रवेश मिळवून देणाऱ्या कैलास मुदलीयारने पालिकेच्या मैदानात हे अनधिकृत स्थळ उभारण्याची हिंमत दाखविली होती. इतकेच नव्हे तर, ते हटविण्याची कारवाई होण्याआधी त्याने पालिका वकिलाला धमकावत शासकीय दस्तावेज मागितल्याचे उघड झाले. या प्रकरणी मुदलीयारविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून तो फरार आहे. तर अतिक्रमण हटविताना विरोध करणारा त्याचा भाऊ गिरीश मुदलीयारला पोलिसांनी ताब्यात घेतले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे काम सुरू आहे. पालिकेने पहिल्या टप्प्यात निश्चित केलेली सर्व अतिक्रमणे शांततेत हटविली गेली असताना नाशिकरोड भागातील अनधिकृत स्थळाचे काय होणार, याकडे सर्वाचे लक्ष होते. अखेर त्यावर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत शांततेत पार पडलेल्या मोहिमेला हे स्थळ उभारणाऱ्यांकडून गालबोट लागले. शिखरेवाडी मैदानातील एका कोपऱ्यात हे स्थळ उभारण्याची हिंमत मुदलीयारने दाखविली होती. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या कैलास मुदलीयारची परिसरात चांगलीच दहशत आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा कट्टर समर्थक म्हणून वावरणाऱ्या मुदलीयारने उभारलेल्या या स्थळाकडे पालिकेने बरीच वर्षे कानाडोळा केला. परंतु, न्यायालयाच्या निर्देशामुळे ते हटवण्याचा मार्ग मोकळा झाला. सकाळी पालिकेचे २०० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक धडकले. जवळपास १५० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला. अतिक्रमण काढण्यास कैलासचा भाऊ गिरीश व कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला. त्याला उपनगर पोलिसांनी ताब्यात घेत जमावावर सौम्य लाठीमार केला. कमान तोडल्यानंतर काही महिला वास्तू पाडू नका अशी विनंती करत होत्या. परंतु, महिला पोलिसांनी त्यांना बाजूला करत काम सुरू ठेवले. तीन जेसीबी आणि अन्य सामग्रीच्या साहाय्याने सायंकाळी उशिरापर्यंत स्थळ हटविण्याचे काम सुरू होते.

शहरातील भव्य दिव्य धार्मिक स्थळांमध्ये या अनधिकृत वास्तूचा समावेश राहिला. विशिष्ट दगड व कलाकुसर केलेल्या खांबांचा वापर करून कोटय़वधी रुपये खर्चून ही वास्तू साकारले गेली. शिर्डी व नाशिकला येणारे भाविक मुक्तिधाम मंदिरास आवर्जून भेट देतात. हे लक्षात घेऊन मुदलीयारने बालाजी सोशल फाऊंडेशनमार्फत उभारलेल्या स्थळाची जाहिरातबाजी करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. त्यामुळे बाहेरगावहून येणाऱ्या अनभिज्ञ भाविकांची पावले आपसूक या स्थळाकडे वळायची. कारवाई टाळण्यासाठी मुदलीयारने न्यायालयात अर्ज केला आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात भुजबळ कारागृहात गेल्यानंतर भुजबळ समर्थक वादग्रस्त व्यक्तींची सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी चढाओढ सुरू झाली. मुदलीयार त्यांपैकीच एक. पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, काही दिवसांपूर्वी गिरीश मुदलीयारने सेनेत प्रवेश केला होता. सत्ताधारी पक्षात सहभागी होऊन हे स्थळ वाचविण्याची संबंधितांची धडपड राहिली. दरम्यान, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कैलासला पक्षात प्रवेश दिला नसल्याचे म्हटले आहे.

पालिका वकिलास धमकी

नाशिकरोडच्या अनधिकृत धार्मिक स्थळाशी संबंधित न्यायालयात दाखल याचिकेवर महापालिकेची सक्षमपणे बाजू मांडू नये तसेच या विषयाशी संबंधित शासकीय दस्तावेज द्यावेत, यासाठी कैलासने ७ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत पालिकेचे या प्रकरणातील वकिलांना भ्रमणध्वनीवरून जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात अ‍ॅड. शिरीश पारख यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मुदलीयार विरुद्ध धमकी, खंडणीची मागणी, शासकीय कामात अडथळा आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रात्रीच मुदलीयारचा शोध सुरू केला. पण, तो फरार आहे. त्याच्या घराची झडती घेण्यात आली. अनधिकृत वास्तू वाचविण्यासाठी पालिकेच्या वकिलास धमकावण्याची हिंमत मुदलीयारने दाखवल्याचे यावरून उघड झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 3:07 am

Web Title: action on unauthorized and disputed religious structure
Next Stories
1 व्यापाऱ्यांच्या धनादेशाची रक्कम २४ तासांत शेतकऱ्याच्या बँक खात्यात
2 मुबलक चलन, पण सुटय़ा पैशांची अडचण
3 चलनकल्लोळमुळे शेतमजुरांची उपासमार
Just Now!
X