*  १३८ पैकी १७ जणांचा सकारात्मक अहवाल  *  मालेगावमध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची साशंकता

नाशिक : दररोज सरासरी २०० हून अधिक नवे रुग्ण सापडणाऱ्या नाशिकमध्ये करोनाचा आलेख उंचावत असताना मालेगाव शहरात दुसरी लाट येते की काय, अशी धास्ती व्यक्त होत आहे. गुरूवारी दुपापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात मालेगावमध्ये पुन्हा १३ रुग्ण सापडले. मनमाड शहरही करोनाचे केंद्रबिंदू ठरण्याच्या मार्गावर आहे. नाशिक शहरात प्रतिजन (अ‍ॅन्टी जेन) संचांच्या वापरामुळे संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्यांना वेग प्राप्त आला आहे. गुरूवारी सायंकाळपर्यंत १३८ व्यक्तींच्या प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १७ रुग्ण सकारात्मक आढळले.

पंधरवडय़ात नाशिक शहरात करोनाचा उद्रेक झाला असून त्यावर नियंत्रण मिळवताना यंत्रणांची दमछाक होत आहे. टाळेबंदीचे र्निबध शिथील झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी नेहमीप्रमाणे गर्दी सुरू झाली. त्यावेळी सुरक्षित अंतराचे पथ्य, मुखपट्टी परिधान करणे, हातांची स्वच्छता या नियमांचा अनेकांना विसर पडल्याने करोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात झाल्याचे दिसून येते. दाट लोकवस्तीच्या भागात समूह पातळीवर करोनाचा प्रादुर्भाव होत आहे. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची स्पष्टता झाल्यानंतर त्यांचे नमुने घेण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी वाढल्या. संपर्कातील व्यक्तींच्या जलद चाचणीसाठी शासनाकडून प्रतिजन चाचणी संच उपलब्ध झाले. महापालिकेने स्वत: काही संचांची खरेदी केली.

या संचांची उपलब्धता झाल्यानंतर चाचण्यांचा वेग वाढला आहे. करोना चाचणीला वेळ लागतो. प्रतिजन चाचणीद्वारे सकारात्मक रुग्णांची स्पष्टता तुलनेत लवकर होते. शहरातील सर्वासाठी ही तपासणी नाही. बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती, वृध्द व्यक्तींची आणि विविध आजारांनी त्रस्त नागरिक यांची तपासणी या प्रतिजन चाचणीतून होईल. पहिल्या दिवशी वडाळा गाव आणि फुलेनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७९ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील वडाळा गाव येथील तीन आणि पंचवटीतील मायको दवाखान्यात सहा व्यक्तींचे अहवाल सकारात्मक आले. दुसऱ्या दिवशी १३८ व्यक्तींची प्रतिजन चाचणी करण्यात आली. त्यात १७ जणांचे अहवाल सकारात्मक आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. सध्या शहरात करोनाचे दररोज २०० हून अधिक बाधित रुग्ण आढळत आहे. प्रतिजन चाचणीमुळे बाधितांची स्पष्टता होऊन त्यांचे विलगीकरण, उपचार करण्यास हातभार लागणार आहे.

शहराबरोबर ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मालेगावमध्ये नव्याने रुग्ण वाढत असल्याने करोनाची दुसरी लाट येते की काय, अशी साशंकता व्यक्त होत आहे. गुरूवारी सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालात मालेगाव आणि मनमाडमध्ये प्रत्येकी १३ नवीन रुग्ण आढळले. या शिवाय इगतपुरी तालुक्यात आठ तर सटाणा तालुक्यात दोघांचा अहवाल सकारात्मक आला. वाढत्या रुग्णांमुळे जिल्ह्य़ाची रुग्णसंख्या साडे सहा हजाराच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. आतापर्यंत ३५११ रुग्ण बरे होऊन घरी परतले तर २९८ जणांचा मृत्यू झाला. सध्या सुमारे अडीच हजार रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.