मनमाडकरांना उपलब्ध पाणी अडीच महिने पुरविण्याचे आव्हान

मनमाड : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला तोंड देत असतानाच मनमाडकरांसमोर पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे. शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून पालखेड कालव्याचे आवर्तन देण्यात आले. त्यातून शहराला पाणीपुरवठा करणारा पालखेड साठवणूक तलाव भरून देण्यात आला आहे. पुढील आवर्तन हे २५ जूननंतर देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सध्याचे पाणी अडीच महिने म्हणजे जूनअखेर पर्यंत पुरवावे लागणार आहे. मुख्य जल वाहिनीतून गळती होत असल्याने नागरिकांना टंचाईला तोंड द्यावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

पालखेड डाव्या कालव्याचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने यांनी तशी सूचना केली आहे. यंदा पालखेड धरणात ५०० दशलक्ष घनफूट पाणी कमी असतांनाही पालखेड डाव्या कालव्याचे रब्बी हंगाम  तसेच आकस्मित आवर्तनाचे आरक्षण सुमारे महिनाभर देण्यात आले.

पालखेड धरण लाभ क्षेत्रात यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने ४०० दशलक्ष घनफूटची तूट होती. तरीही शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून नुकतेच पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन कालव्यावरील सर्व १६० पाणी वापर संस्थांना देण्यात आले. त्यातून येवला नगरपालिकेसह ३८ गाव पाणीपुरवठा योजना, मनमाड  मध्य रेल्वे तसेच मनमाड नगर परिषदेच्या वाघदर्डी धरणांत सोडण्यासाठी साठवण तलाव या आवर्तनातून पूर्ण क्षमतेने भरून देण्यात आले.

ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सिंचन कर्मचाऱ्यांची संख्या कमी असताना हे आवर्तन देऊन तूर्तास नागरिकांची सोय झाली. नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांनी उपलब्ध पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन केले आहे. एस. एम. भाले यांनी वागदर्डी धरण ते शहरापर्यंतच्या मुख्य वाहिनीला अनेक ठिकाणी हजारो लिटर पाण्याची गळती सुरू असल्याची तक्रार केली. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात अपव्यय होत असून मे व जून महिन्यात नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याचे म्हटले आहे.

१४ दिवसाआड केवळ एक तास पाणी

मनमाड  शहराला सध्या १४ दिवसाआड एक वेळ, फक्त एक तास नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणांतही जेमतेम साठा उरलेला आहे. सर्व भिस्त पाटोदा तलावातील साठय़ावर आहे. उपलब्ध पाणीसाठा हा जून अखेर म्हणजे आणखी अडीच महिने पुरवावा लागणार आहे. करोना काळात सर्व शासकीय यंत्रणा त्यासंबंधीच्या कामात गुंतली आहे. त्यात जर पाणीटंचाई भीषण झाली तर पुढे अनेक प्रश्न उद्भवतील. नगरपालिकेकडे पाणी वितरणाचे कोणतेही नियोजन नाही.