सिग्नल व्यवस्था कार्यान्वित, भुयारी मार्गातील समस्यांची सोडवणूक

नाशिक : उड्डाण पूल, पादचारी मार्ग, वाहतूक बेटाचा आकार कमी करणे, अशा अनेक सुविधा होऊनही वाहतूक कोंडीत गुरफटलेल्या शहरातील मुख्य द्वारका चौकाने अखेर मोकळा श्वास घेण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. चौकात कार्यान्वित झालेल्या सिग्नल व्यवस्थेचे उद्घाटन बुधवारी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले.

सिग्नल यंत्रणेमुळे चौकातील वाहतूक कोंडी दूर झाली. शिवाय बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम होणार आहे. याआधीच तयार केलेला, परंतु विविध कारणास्तव वापरात नसलेल्या भुयारी मार्गाचे नुतनीकरण करून तो पुन्हा पादचाऱ्यांसाठी खुला देखील करण्यात आला आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, नाशिक-पुणे रस्ता, नाशिकरोड-शहराचा उर्वरित भाग या रस्त्यावरील द्वारका हा मुख्य चौक आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाण पुलाची निर्मिती झाल्यानंतर या चौकातील कोंडी दूर होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, तसे घडले नाही. उलट दिवसागणिक वाढत्या वाहनांमुळे चौकातील कोंडीचा प्रश्न जटील बनत गेला. अवजड वाहनांमुळे त्यात भर पडत गेली. मध्यंतरी यावर तोडगा म्हणून अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले. तरी देखील द्वारका चौकातील मूळ प्रश्न पूर्णपणे सुटला नाही. द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर उपाय योजनेसाठी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाने अभ्यास सुरू केला. अवजड वाहने पर्यायी मार्गाने जात असली तरी पुण्याहून येणारी आणि मुंबई-आग्रा महामार्गावरून ये-जा करणारी, शहरातील चारचाकी आणि अन्य लहान वाहनांची संख्या मोठी आहे. या चौकातून तासाला सर्व मिळून पाच हजार वाहने मार्गस्थ होतात. यात पुढे जाण्याच्या चढाओढीत काही वाहनधारक नियमांचे पालन करीत नाही. ही बाब कोंडीचे कारण ठरते. दुसरा मुद्दा होता तो पादचाऱ्यांसाठी बनविलेला परंतु, वापरला न जाणाऱ्या भुयारी मार्गाचा. चौकात सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करत भुयारी मार्गातील समस्या सोडवून तो पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला. सिग्नल व्यवस्थेच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांच्यासह उपायुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले, निरीक्षक साजन सोनवणे आणि विजय ढमाळ आदी उपस्थित होते.

नव्या व्यवस्थेचे दृश्य परिणाम आता द्वारका चौकात दिसत आहेत. सिग्नल व्यवस्थेमुळे चौकात एकाचवेळी चारही बाजूने होणारी वाहनांची गर्दी टळली आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी  दोन सत्रात वाहतूक पोलीस विभागाचे दोन अधिकारी आणि कर्मचारी असे २० ते २२ जण कार्यरत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर लगेच कारवाई केली जाते. यामुळे वाहतुकीला शिस्त लागणार असल्याचे वाहतूक विभागाचे अधिकारी भारतकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले.

भुयारी मार्गासाठी सुरक्षारक्षक

या चौकात ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी भुयारी मार्गाची व्यवस्था असली तरी तिचा वापर होत नव्हता. अपुरी प्रकाश व्यवस्था, टवाळखोरांची गर्दी यामुळे नागरिक भुयारी मार्गाचा वापर टाळत होते. ही बाब लक्षात आल्यावर आता भुयारी मार्गात स्वच्छ प्रकाश पडेल अशी प्रकाशयोजना करण्यात आली. शिवाय रंगकाम करून मार्गाचे नुतनीकरण करण्यात आले. सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत भुयारी मार्ग खुला राहील. या काळात तिथे सुरक्षारक्षकाची नेमणूक केली जाणार आहे. मार्गात पादचाऱ्यांना ज्या भागाकडे जायचे आहे, त्याचे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. यामुळे पादचारी भुयारी मार्गाचा अधिक्याने वापर करतील, अशी अपेक्षा आहे.