रुग्णालयांसमोर प्राणवायूचे संकट

नाशिक : रेमडेसिविरपाठोपाठ गंभीर रुग्णांना प्राणवायूसज्ज खाटा मिळणे अवघड झाले आहे. रुग्णालयांना देखील प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने त्याची परिणती सुविचार रुग्णालयातील गंभीर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात झाली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्राणवायूसज्ज खाटा मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. आता रुग्णालयात दाखल रुग्णांना प्राणवायूअभावी अन्य रुग्णालय शोधण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा होत असून संबंधित रुग्णालयात दुपारी आठ सिलिंडर उपलब्ध झाली. परंतु, रुग्णालयाने विहित मार्गाऐवजी अवलंबलेला मार्ग भीतीचे वातावरण निर्माण करण्यास हातभार लावत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

जिल्ह्यात करोनाचा आलेख झपाटय़ाने उंचावत असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयातील प्राणवायूची सुविधा असणाऱ्या खाटा कमी पडू लागल्या आहेत. या खाटा मिळवतांना नातेवाईकांची दमछाक झाली असताना रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या परिस्थितीवर ‘नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकला होता.

प्राणवायूअभावी रुग्णालयांसह नातेवाईकांचा जीव टांगणीला लागल्याची बाब बुधवारी सुविचार रुग्णालयातील घटनेवरून समोर आली. या रुग्णालयातील सात ते आठ रुग्ण अतिदक्षता कक्षात उपचार घेत होते. रुग्णालयाकडे प्राणवायूचा साठा संपुष्टात आल्याने व्यवस्थापनाने रुग्णांना अन्यत्र नेण्यास सांगितले. मुळात प्राणवायूची सुविधा असणाऱ्या खाटा अथक प्रयत्नांनीही मिळत नाही. ज्या रुग्णालयात ती मिळाली, तेथून अन्यत्र जाण्यास सांगितल्याने नातेवाईकांना धक्का बसला. आपत्कालीन परिस्थितीत अन्य एका रुग्णालयात व्यवस्था झाल्यानंतर संबंधितांना रुग्णवाहिकेतून हलविण्यात आले. पुरेशा प्रमाणात प्राणवायू मिळत नाही. पुढील तीन दिवस पुरवठा होणार नसल्याने पुरवठादारांकडून सांगण्यात आले. त्यामुळे नाइलाजास्तव नातेवाईकांना उपरोक्त सूचना द्यावी लागल्याचे व्यवस्थापनाने प्रसारमाध्यमांना सांगितले.

या घटनेची माहिती समजल्यानंतर दुपारी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी यांच्यासह पथक थेट सुविचार रुग्णालयात पोहोचले. या ठिकाणी प्राणवायुची काय स्थिती आहे, पुरवठय़ातील बाबींची पडताळणी केली. दुपारी या रुग्णालयास आठ सिलिंडरही उपलब्ध झाले. तरीदेखील रुग्णालयाने रुग्णांना अन्यत्र हलविण्यास भाग पाडले. या बाबी जिल्हा प्रशासनासमोर मांडल्या जातील.

संबंधित रुग्णालयावर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे गवळी यांनी सांगितले. वाढत्या रुग्णांमुळे प्राणवायूचा तुटवडा भासू शकतो याची प्रशासकीय यंत्रणेला कल्पना होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाने पुरवठादार आणि रुग्णालयांना करारनामा करण्याचे आवाहन केले होते. करारनामा केल्यानंतर आवश्यक तेवढा प्राणवायू पुरवठय़ाची जबाबदारी पुरवठादारावर असते. अनेक रुग्णालयांनी तसा करारनामा करण्याकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.

जिल्ह्यात प्राणवायूचा तुटवडा नाही

जिल्ह्यात १० पुरवठादारांकडून दररोज ११४ मेट्रिक टन प्राणवायूचे वितरण केले जाते. सध्या औद्योगिकऐवजी बहुतांश साठा वैद्यकीय कारणास्तव दिला जात आहे. वैद्यकीय कारणांसाठी दैनंदिन ३१ मेट्रिक टन प्राणवायू लागतो. बुधवारी ९१ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा झाला होता. त्यातील ५८ मेट्रीक टन अतिरिक्त प्राणवायू वितरित करण्यात आला. सुविचार रुग्णालयाने प्राणवायूची निकड योग्य मार्गाने मांडली नाही. गुरूवारी दुपारी आठ सिलिंडर रुग्णालयास मिळाली.

– संतोष गवळी (प्राणवायू पुरवठय़ाचे सनियंत्रक)