24 September 2020

News Flash

‘१०८’ रुग्णवाहिका सेवेतही अडथळे

साधारणत: तीन वर्षांपूर्वी आरोग्य विभागाने ‘१०८ रुग्णवाहिका’ ही संकल्पना मांडली.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना ‘गोल्डन पीरियड’मध्ये तातडीने प्राथमिक उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने १०८ रुग्णवाहिका हा अभिनव उपक्रम हाती घेतला. राज्यात नाशिक या सुविधेचा लाभ घेण्यात अग्रेसर असला तरी ग्रामीण भागात या सेवेविषयी तक्रारी वाढत आहे. वारंवार संपर्क साधूनही रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागात अन्य रुग्णवाहिका वा वाहनाची सोय उपलब्ध करावी लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळते.

साधारणत: तीन वर्षांपूर्वी आरोग्य विभागाने ‘१०८ रुग्णवाहिका’ ही संकल्पना मांडली. रस्ता-महामार्ग परिसरात अपघात झाला, ग्रामीण विशेषत: दुर्गम भागात गरोदर मातेला रुग्णालयात नेणे, कुपोषित बालकांना व्हीसीडीसी किंवा जिल्हा शासकीय रुग्णालयातील कक्षात आणणे अशा विविध वैद्यकीय सेवा सुविधा देण्यासाठी मोफत रुग्णवाहिका देणे हा या उपक्रमामागचा हेतू. नाशिक जिल्ह्य़ाचा विचार केल्यास ४६ रुग्णवाहिका असून त्या १०८ क्रमांकावर सेवा देत आहे. सुरुवातीच्या काळात हजारो रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला. त्यात गरोदर मातांची प्रसूतीही या रुग्णवाहिकेत झाल्याने समाधानकारक सेवा देण्यात राज्यात नाशिक अव्वल राहिले. मात्र जशी वर्षे सरली, तसे सेवासुविधेत खंड पडू लागला.

एका रुग्णवाहिकेला ३० किलोमीटरच्या परिघात रुग्णसेवा देणे बंधनकारक असताना बऱ्याचदा १०८ क्रमांकाशी संपर्क साधल्यावर आमच्याकडे वाहन नाही, वाहन असले तर चालक नाही,  ती आमची हद्द नाही.. अशी कारणे देत सेवा नाकारली जाते. रुग्णवाहिकेच्या सेवेतही राजकारणाचा शिरकाव झाला आहे. काही सक्रिय लोकप्रतिनिधी १०८च्या रुग्णवाहिकेने केवळ आपल्या भागातच सेवा द्यावी, असा आग्रह धरतात. या स्थितीचा फायदा घेत १०८ रुग्णवाहिका सेवा देणारी संस्था रुग्णांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवत असल्याची तक्रार ग्रामीण भागांतून सातत्याने केली जाते. अशा काही तक्रारी झाल्या की, आरोग्य विभाग बैठकीत खासगी संस्थेला केवळ समज देण्याचे काम नेटाने करीत असल्याचे दिसून येते.

१०८ रुग्णवाहिकेच्या सेवेबद्दल आदिवासी भागात काम करणाऱ्या श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी तक्रारीचा सूर लावला. रुग्णवाहिकेची मागणी केल्यास आमच्याकडे वाहन नाही, ती हद्द आमची नाही असे सांगत सेवा देण्यास टाळाटाळ केली जाते. काही वेळा तातडीने सेवा दिली जाते. रुग्णवाहिकेत असलेले रुग्णाचे नातेवाईक किंवा आशा, अंगणवाडी सेविका यांच्याशी चालक अरेरावीने बोलतात.

इगतपुरी तालुक्यात १०८ क्रमांकाची सेवा नाजूक अवस्थेत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते भास्कर सोनवणे यांनी सांगितले. १०८ क्रमांकाची सेवा मिळणे दुरापास्त असल्याने एका सामाजिक संस्थेने मुंबई-आग्रा महामार्गावर स्वत:ची रुग्णवाहिका सज्ज ठेवल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे १०८ रुग्णवाहिकेचे व्यवस्थापन करणाऱ्या भारत विकास ग्रुपने हे आक्षेप फेटाळत या सेवेबद्दल एकही तक्रार नसल्याचा दावा केला.

या आर्थिक वर्षांत नाशिक जिल्ह्य़ातील १९ हजार ४९४ रुग्णांनी रुग्णवाहिकेचा लाभ घेतला. त्यात गर्भवती (८१५७), अपघात (२७६५), हाणामारी (४७५), जाळणे (११३), हृदयविकार (७४), पडझड (५२८), विषबाधा (८५६), वीज पडून, झाड कोसळून (३८), अपघात (९७), आत्महत्येचा प्रयत्न (१६), पॉलीट्रामा (२७), इतर (१४८७) रुग्णांचा समावेश आहे.

खासगी संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार?

१०८ रुग्णवाहिकेचे काम भारत विकास ग्रुपला दिले आहे. ती खासगी संस्था असल्याने त्यावर सरकारचे नियंत्रण नाही. त्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी कामचुकारपणा केला तर समज देण्यापलीकडे किंवा वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्याव्यतिरिक्त काही करता येत नाही. आम्ही दोन १०८ रुग्णवाहिकेची मागणी केली आहे.  डॉ. सुशील वाकचौरे (जिल्हा आरोग्य अधिकारी)

एकही तक्रार नाही

१०८ रुग्णवाहिका सेवेविषयी अद्याप एकही तक्रार प्राप्त नाही. एखाद्या कॉलवर रुग्णवाहिका मिळत नसेल तर त्या संदर्भातील नियंत्रण कक्षातून जीपीएस प्रणालीद्वारे आम्ही जवळच्या रुग्णवाहिका तेथे पाठवतो. नाशिकमध्ये ही सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ८४ हजार ८९५ रुग्णांनी या रुग्णवाहिकेचा लाभ घेतला आहे. त्यात गर्भवती महिलांचे प्रमाण अधिक असून मालेगाव येथून सर्वाधिक दूरध्वनी आले.   डॉ. अश्विन राघमवार (भारत विकास ग्रुप, १०८ प्रकल्प समन्वयक)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 3:11 am

Web Title: problem in emergency ambulance service at nashik
Next Stories
1 हेल्मेट जनजागृतीसाठी थेट ‘गणेशा’चे साकडे
2 बस न थांबविल्यास कारवाई
3 सत्तेतील पहारेकरी झोपी गेलाय, विखे-पाटील यांचा उद्धव ठाकरेंना टोला
Just Now!
X