नाशिक – आदिवासीबहुल दुर्गम अशा इगतपुरी तालुक्यातील आवळे ग्रुप ग्रामपंचायतपैकी पलाटवाडी येथे अंगणवाडी इमारत नसल्याने रस्त्यावरील मंदिरात बसून आहार वाटप करण्याची वेळ अंगणवाडी सेविकांवर आली आहे.

इगतपुरी तालुक्यातील पलाटवाडी येथे पंतप्रधान जन मन योजने अंतर्गत अंगणवाडी मंजूर करण्यात आली आहे. अंगणवाडी मंजूर असली तरी इमारत नसल्याने दोन डोंगरांमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत एका शेडमध्ये अंगणवाडी भरत आहे. पावसामुळे सध्या शेडखाली चिखल झाल्याने मिळेल त्या ठिकाणी अंगणवाडी भरवली जात आहे. अंगणवाडी सेविका या त्या ठिकाणी न जाता रस्त्यात असलेल्या वाघोबाच्या मंदिरात बसून अंगणवाडीचा पोषण आहार वाटप करत आहेत.

दरम्यान, या आहाराच्या पिशव्या कुरतडलेल्या अवस्थेत राहात असल्याने बालके तसेच पालक नाराजी व्यक्त करत आहेत. बालकांचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या तसेच आहार पुरवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेकडे सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. हा आहार बंद करून मुलांना शिजवलेला आहार द्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

दरम्यान, बाल विकास प्रकल्प अधिकारी भारती गर्जे यांनी यासंदर्भात माहिती दिली. डोंगरावरील कातकरी समाजासाठी अंगणवाडी मंजुर झाली असली तरी इमारत नाही. कारण जागा वनविभागाची आहे. यामुळे वनविभागाच्या मोकळ्या जागेत एका शेडखाली अंगणवाडी भरवली जाते. पावसामुळे या ठिकाणी चिखल आहे.

अंगणवाडीच्या बालकांना याठिकाणी येता येत नसल्याने सध्या वर्ग भरत नाहीत. अशा स्थितीत मुलांना घरी जाऊन आहार दिला जात आहे. ज्यांना तो दिला जात नाही, अशा बालकांना मंदिराच्या आवारात बसून तो देण्याची व्यवस्था आहे. पाकीट उंदराने कुरतडल्यामुळे फुटले की अन्य कारणांनी याचा अहवाल मागविण्यात आला आहे. आहार साठवण्यासाठी इमारत नसल्याने अडचणी येत असल्याचे गर्जे यांनी नमूद केले.