नाशिक – राज्यातील सरकारी शाळांमधील मतदान केंद्र बंद करून ती भाजपच्या कार्यालयात ठेवावी. भाजपच्या कार्यालयातून मतदान झाले पाहिजे. त्यांची मंडळी यंत्रावर मतदान करतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले उमेदवार निवडून आणतील, असा टोला प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी लगावला. संपूर्ण देशात लोकशाहीचे पतन होत आहे. इव्हीएम भाजपचा मित्र आहे. त्या पक्षातून निवडून आलेली मंडळी म्हणजे इव्हीएम यंत्राचे पहिलवान असल्याचे टिकास्त्र त्यांनी सोडले.
शनिवारी येवला येथे एका कार्यक्रमानिमित्त कडू हे आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, इडी व निवडणूक आयोगाचा सत्ताधाऱ्यांकडून होणारा वापर आदी विषयांवर भाष्य केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या की नाही, याचा विचार करावा लागत आहे. कारण वस्तुस्थिती तशी आहे. संपूर्ण यंत्रणा भाजपच्या ताब्यात आहे. विनाकारण प्रचारावर खर्च होतो. गावागावात तणाव निर्माण होतो. यापेक्षा मतदान केंद्र भाजपच्या कार्यालयात स्थलांतरीत करून तिथे सर्व सोपस्कार पार पाडावे, असे पत्र प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवडणूक आयोगाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानावर कडू यांनी इव्हीएम यंत्र भाजपचा मित्र असल्याकडे लक्ष वेधले. निवडणूक आयोगामुळे भाजपला मस्ती आली आहे. हिंमत असेल तर व्हिव्ही पॅट यंत्रावर कागदावर क्रमांक टाकून, स्वाक्षरी देऊन मतदान घेऊन दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले. भाजपची मंडळी इव्हीएम यंत्राचे पहिलवान असून एकवेळ खिसेकापू परवडला पण हे नको, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. निवडणूक आयोग व ईडी सारख्या संस्थांचा मनमानीपणे वापर होत आहे. यामुळे देशात म्हणायला लोकशाही, पण भाजपची हुकुमशाही राहणार अशी अवस्था असल्याचे कडू यांनी सांगितले.
ठाकरे बंधू एकत्र येण्याने काय होईल, असा प्रश्न करीत कडू यांनी कांदा सोयाबीन, कापूस, तूर अशा कुठल्याही पिकाला भाव नसल्याचे सांगितले. ठाकरे बंधूंनी मुंबई जिंकली तरी शेतकरी, मजूर, आरोग्य व्यवस्था आदी प्रश्न सुटतील का असे ते म्हणाले.
पोलीस अधिकाऱ्यात इतकी हिंमत कशी ?
जालना येथे आंदोलकाच्या मागे धावत जात त्याला लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी दखल घ्यायला हवी. पोलीस अधिकाऱ्यांमध्ये इतकी हिंमत कशी आली. मंत्री पंकजा मुंडे यांनी त्या अधिकाऱ्याला समज देणे गरजेचे होते. संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करणे पुरेसे ठरणार नाही. तर शेतकऱ्याकडून त्या अधिकाऱ्याविरुद्ध तशीच कृती होणे आवश्यक आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया कडू यांनी दिली.