जळगाव – केंद्र सरकारने जीएसटी स्लॅबमध्ये बदल केल्याने सामान्य जनतेला त्याचा काय फायदा होईल, याची माहिती देण्यासाठी भाजपने शहरात शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी काही प्रश्न विचारताच भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण चिडल्याचे दिसून आले. तुम्ही मला असे प्रश्न विचारू शकत नाही. मी पण एकेकाळी संपादक होतो, असेही त्यांनी पत्रकारांना सुनावले.
राज्यात सरकार कोणाचेही असले तरी जीएसटी दर कपातीमुळे जनतेला, प्रत्येक कुटुंबाला, गरिबांना, मध्यमवर्गीयांना, लहान-मोठ्या उद्योजकांना, व्यापाऱ्याला आणि व्यावसायिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. मोदी सरकार सर्व वर्गातील जनतेचे भले करण्यासाठी विकासाचे राजकारण करत राहणार आहे, असा विश्वास भाजपचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी भाजपच्या प्रदेश पदाधिकारी डॉ. केतकी पाटील, जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, पूर्व जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आर्थिक सुधारणांचा वेग वाढविणे, ही देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची गरज होती. मोदी सरकारने हे ओळखून सुधारणांना बळ देणाऱ्या योजना आखल्या. त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत केले. एक मजबूत अर्थव्यवस्था असलेला आत्मनिर्भर भारत उभा करण्याचे उद्दिष्ट, या सुधारणांमुळे शक्य झाले. जीएसटी करआकारणीचा पहिला टप्पा एक जुलै २०१७ रोजी सुरू झाला.
तेव्हापासून खऱ्या अर्थाने आर्थिक सुधारणांचा वेग झपाट्याने वाढला. त्यामुळेच आज देशातील २५ कोटी लोकसंख्या दारिद्र्यरेषेच्या वर आली. देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर पोहोचली. ही वाटचाल अलिकडे अधिक वेगवान झाली असून, जागतिक पातळीवरील आर्थिक अस्थिरतेच्या काळातही भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार असल्याचा निर्वाळा जागतिक वित्तसंस्थांनी दिला आहे, असे चव्हाण म्हणाले.
दरम्यान, अजित चव्हाण हे जीएसटी स्लॅबमध्ये बदल झाल्याने सामान्य जनतेला त्याचा काय फायदा होईल, याची माहिती देत असताना पत्रकारांनी आधीच्या जीएसटी कर रचनेमुळे जनतेची लूट झाली त्याचे काय, असा प्रश्न उपस्थित केला. त्याचे उत्तर देण्याऐवजी चव्हाण यांनी उलट पत्रकारांना ती जनतेची लूट कशी म्हणता येईल, तो कर तुम्ही निजामशहा किंवा आदिलशहाला दिला का, असे प्रश्न केले. त्यानंतर पत्रकारांनीही आम्ही प्रश्न विचारतो त्याची उत्तरे द्या. बाकी तुम्ही प्रति प्रश्न करू नका, असे स्पष्ट केले.
त्यानंतर मात्र अजित चव्हाण चिडल्याचे पाहायला मिळाले. पत्रकार माझ्यावर जबरदस्ती नाही करू शकत. मला जे सांगायचे आहे ते मी सांगू शकतो. पत्रकार मला कसे काय प्रश्न विचारतील. मी कसा प्रति प्रश्न करू शकणार नाही. मी सुद्धा संपादक होतो, असे बोलून त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ज्यामुळे पत्रकार परिषदेतील वातावरण चांगलेच तापले.