नाशिक : मुंबईत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रातील महायुती सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या शासकीय आदेशाने ओबीसी समाजाने आपली नाराजी व्यक्त केली आहे. वेळोवेळी या समाजाच्या नेत्यांकडून महायुती सरकारचे आदेश कसे चुकीचे आहेत, हे मांडले जात आहे. यासंदर्भात अलिकडेच नागपूर येथे ओबीसी समाजाचा मोठा मोर्चाही काढण्यात आला होता. पक्षविरहित या मोर्चात विविध पक्षांचे ओबीसी नेते सहभागी झाले होते. यापुढील मोर्चा बीडमध्ये १७ ऑक्टोबरला काढला जाणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ सहभागी होणार आहेत. त्यामुळे या मोर्चाच्या अनुषंगाने आणि इतर विषयांवर भुजबळ यांनी येवला येथे भूमिका मांडली.
मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतल्यानंतर ओबीसी समाजात असंतोषाचे फटाके फुटले. ओबीसी समाज या निर्णयाविरोधात राजकीय पक्षभेद विसरुन एकवटू लागला आहे. नागपूर येथे काढण्यात आलेला मोर्चा त्यापैकीच एक होता. आता बीड येथे मोर्चाची तयारी केली जात आहे. महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फटका ओबीसी समाजाला बसणार असल्याचे ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे. ओबीसी समाज नाराज असताना सत्ताधारी मंत्री मनोज जरांगे यांची भेट घेत असल्याने ओबीसी समाजाच्या नेत्यांमधील नाराजीत अधिक वाढ झाली आहे.
याआधी मराठा समाजाचे अनेक राजकारणी नेते झाले. त्यांची मानसिकता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची होती. एकमेकांना विश्वासात घेतले जात होते. आता मात्र तसे होत नाही. आम्ही आरक्षणासाठी कोणाशी भांडत नाही. ओबीसी आरक्षणातील घुसखोरीविषयी सरकार काही करत नसल्याने आम्ही न्यायालयात गेलो, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी यााधी मांडली होती. सत्ताधारी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांची भेट कुठल्या कारणासाठी झाली हे माहिती नसल्याचेही भुजबळ यांनी याआधी म्हटले होते. परंतु, या भेटीमुळे निर्माण झालेली अस्वस्थता भुजबळ यांनी येवला येथील दौऱ्याप्रसंगी संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना पुन्हा व्यक्त केली.१७ ऑक्टोबर रोजी ओबीसी मोर्चासाठी छगन भुजबळ हे बीड येथे जाणार आहेत.
भुजबळ यांना बीड जिल्ह्यात येऊ दिले जाणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला असल्याकडे भुजबळ यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर भुजबळ यांनी, देशात लोकशाही असल्याचे स्पष्ट केले. मंत्र्यांनी जायचे नाही, असे म्हणतात. मग, सर्व संपले असतानाही मनोज जरांगे यांच्या भेटीला राधाकृष्ण विखे पाटील कसे जाऊ शकतात, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. आमच्या समाजावर अन्याय झाल्याचे वाटल्याने आम्ही न्यायालयात गेलो. न्यायालयताच जे काय व्हायचे, ते होऊ द्या, अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली. मनोज जरांगे माझे नाव घेऊन मनात येईल ते बोलतात. त्यामुळे मलाही बोलावे लागते. ओबीसी समाज कोणत्याही इतर समाजाविरुध्द नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, या भूमिकेचा भुजबळ यांनी पुनरुच्चार केला.