लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: माळशेज घाट परिसरातील चोरदरीत चढाई करीत असताना येथील गिर्यारोहक किरण काळे (५२) यांचा मृत्यू झाला. रविवारी ही घटना घडली. काळे यांच्यासह नाशिक येथील जिप्सी ट्रेकर्स ग्रुपचे काही जण रविवारी कल्याण-नगर रस्त्यावरील जुना माळशेज घाट आणि चोरदरी परिसरात भटकंतीसाठी गेले होते. दुपारी चोरदरी चढत असताना शेवटच्या चढाईदरम्यान एका कठीण टप्प्यावरुन काळे हे सुमारे ५० फूट खाली कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गिर्यारोहक ओंकार ओक यांनी तातडीने नाशिक क्लाइम्बर्स तसेच नाशिक क्लाइम्बर्स ॲण्ड रेस्क्युर्स असोसिएशनचे दयानंद कोळी यांच्याशी तसेच जुन्नर येथील शिवनेरी ट्रेकर्सशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. शिवनेरी ट्रेकर्सच्या सदस्यांनी घटनास्थळी पोहचून इतरांना सुखरुप बाहेर काढले. गणेश गीद,अरमान मुजावर, दयानंद कोळी, दीपक विसे, सुनील साबळे यांनी १५० फूट खाली जाऊन काळे यांचा मृतदेह व्यवस्थित बंदिस्त केला. नाशिक क्लाइम्बर्स, टीम सह्यगिरी, टीम बेलपाडा, शिवनेरी ट्रेकर्स, दीपक विसे या सर्वांच्या प्रयत्नाने मृतदेह दरीबाहेर आणण्यात आला.

आणखी वाचा- दुचाकी चोर गुन्हे शाखेच्या जाळ्यात; १४ वाहने हस्तगत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काळे हे मूळचे धुळे येथील रहिवासी होते. कामानिमित्त ते नाशिक येथे आल्यावर टाकळी रोड भागात वास्तव्यास होते. ते आयुर्विम्यात विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना गिरीभ्रमणाची आवड असल्याने त्यांनी अनेक दुर्गभ्रमंती केल्या आहेत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.