नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचा सायकल संमेलनातही सहभाग

नाशिक : पर्यावरण संवर्धन, प्रबोधनासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेली सायकल वारी पंढरपूर येथे पोहचली असून वारीने अहमदनगर, करमाळा, टेंभूर्णीमार्गे जात असताना रस्त्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. पंढरपूर येथे संतश्रेष्ठ तनपुरे महाराजांच्या मठात पोहचल्यावर तेथे रिंगणही करण्यात आले. मठात सायकल संमेलनही झाले. नगर प्रदक्षिणाही करण्यात आली.

सायकल वारीत संपूर्ण महाराष्ट्रातील ३७ सायकल क्लबच्या १५०० सदस्यांनी आपापल्या जिल्ह्यातून सहभाग घेतला. नाशिकहून एक जुलै रोजी या वारीने प्रस्थान केले होते. वारीने सुमारे ४०० किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूर गाठले. नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनच्या वारीने अहमदनगर, करमाळा, टेंभूर्णीमार्गे जात असताना रस्त्यात वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणाचा संदेश दिला. या पर्यावरण संवर्धन पंढरपूर वारीत पंढरपूर, नाशिक,अहमदनगर, औरंगाबाद, बागलाण, बारामती, भुईंज, दोंडाईचा, इचलकरंजी, गंगाखेड, कराड, खडकवासला, कोल्हापूर, कोपरगाव, कोरेगाव, लातूर, लोणी, माढा, माळशिरस, मुंबई, ठाणे, नातेपुते, नेवासा, परभणी, पुणे, राहूरी, सांगली, सातारा, श्रीपूर, श्रीगोंदे, सिन्नर, सोलापूर, उमरगा, उंब्रज या ठिकाणचे क्लबही सामील झाले.

विशेष म्हणजे श्रीगोंदा येथील फक्त महिलांचा सायकल क्लब आणि ठाणे येथील अंध सायकलपटूंचा सहभाग उल्लेखनीय राहिला. अशा सर्व क्लबच्या १५०० सदस्यांनी पंढरपूरला पोहचल्यावर अहिल्याबाई चौकातून नगर प्रदक्षिणा सुरु केली.

पर्यावरणाचा संदेश देत शिस्तबद्ध पद्धतीने चार किलोमीटरची  प्रदक्षिणा पूर्ण केली. वारीच्या या उपक्रमाचे पंढरपूरच्या रहिवाशांनी आणि प्रशासनाने कौतुक केले. रस्त्यात ठिकठिकाणी पंढरपूरच्या रहिवाशांनी रांगोळय़ा काढल्या होत्या. स्वागत कमानी उभारल्या होत्या. सायकलवारी संतश्रेष्ठ श्री तनपुरे महाराजांच्या मठात पोचल्यावर ३०० महिलांनी आतील रिंगण केले. पुरुषांनी बाहेरील बाजूने रिंगण करून पर्यावरणाचा संदेश देत, पांडुरंगाच्या नामाचा जयघोष केला.  

यानंतर मठात महाराष्ट्रातील पहिले सायकल संमेलन सुरू झाले. या संमेलनाचे अध्यक्ष पंढरपूर सायकलर्स क्लबचे अध्यक्ष उमेश परिचारक तसेच या संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष आणि नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे होते.

संमेलनाचे प्रमुख पाहुणे पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य आणि श्री तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सायकल संमेलनात समस्त सायकल क्लबच्या अध्यक्षांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनच्या वतीने पंढरपूर येथील १० गरजू विद्यार्थिनींना सायकली भेट देण्यात आल्या. तसेच नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनच्या नेट झिरो इंडिया या विशेष स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.