नंदुरबार – राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विषयावर मराठीप्रेमींनी सत्ताधाऱ्यांना नमते घेण्यास भाग पाडले असताना दुसरीकडे प्राथमिक शिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याची विदारक परिस्थिती नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात पाहण्यास मिळते. केलखाडी पाड्यातील विद्यार्थ्यांना शाळेपर्यत पोहचण्यासाठी रस्ताच नसल्याने डोंगर, दरीतून पायपीट करावी लागते. त्यातच वाटेत लागणारी नदी आडव्या झालेल्या झाडावरुन पार करावी लागते. नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांनाही पावसाळ्यात असाच धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
प्राथमिक शिक्षणाची ग्रामीण भागातील वाट संकटांनी भरलेली आहे. अक्कलुकवा तालुक्यातील केलखाडी गाव अतिदुर्गम भागात आहे. डोंगर-दऱ्यात वसलेल्या या गावातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेची शाळा गाठण्यासाठी रोज पाच ते सहा किलोमीटर डोंगर- दऱ्यातून पायपीट करावी लागते. पावसाळ्यात त्यांच्या वाटेत केलखाडी नदीचा अडथळा येतो.
पावसाळ्यात नदीला आल्यानंतर केलखाडीतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांना नदीवर आडव्या झालेल्या एका झाडाचा पूल म्हणून वापर करत पैलतीर गाठावे लागते. हा प्रवास अतिशय धोकादायक आणि तितकाच थरारक. जरासा तोल गेला, पाय सटकला की खाली नदीत पडून वाहून जाण्याची भीती. शिक्षणासाठी रोज असा धोकादायक प्रवास करणे, या विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाचा भाग झाला आहे. पाच वर्षापेक्षा अधिक काळापासून ग्रामस्थ येथे पूल बांधून मिळावा म्हणून प्रशासनाकडे विनवणी करीत आहेत. परंतु, ना प्रशासनाचे लक्ष ना लोकप्रतिनिधींचे.
केलखाडी गावाला जोडणाऱ्या नदीवरील हा झाडरुपी पूल ओलांडला की दोन पाडे लागतात. त्यांची जवळपास आठशे लोकसंख्या आहे. पावसाळ्यात कोणी आजारी पडल्यास याच जीवघेण्या पुलावरुन बांबुच्या झोळीतून रुग्णाला न्यावे लागते. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका यांनाही असाच धोकादायक प्रवास करुन सेवा द्यावी लागत आहे.