नाशिक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्यास सर्वच अडचणीत येतील. शिंदे गटाच्या सर्व आमदारांना ताकीद दिली आहे. शिंदे यांच्यावर नाराज होण्याचा कोणालाही अधिकार नाही. पक्षामागे कुरघोडी करणे, हे चालणार नाही. जर कोणी चुकीचे काही केल्यास साहेबांना कारवाई करायला सांगू, असा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला.
सामंत यांच्या उपस्थितीत येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) विभागीय पदाधिकारी मेळावा झाला. मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार संजय गायकवाड यांच्या नाराजीविषयक बातम्यांच्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी पक्षात कुणीही नाराज नसल्याचे सांगितले. विभागातील पाचही जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी संघटनात्मक आढावा घेतला. बैठकीस गुलाबराव पाटील, दादा भुसे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सभासद नोंदणीसह वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली असून याबाबत एकनाथ शिंदे यांना अहवाल दिला जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, ही कार्यकर्त्यांची भावना आहे. ती त्यांनी बोलून दाखवली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिंदे गटात सर्वाधिक प्रवेश होत आहेत. शिंदे काश्मीरला गेल्याचे ठाकरे गटाला दु:ख वाटते. स्वत: दिल्लीत जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केलेल्या व्यक्तींच्या मांडीला मांडी लावून बसतात. सहाव्या रांगेत बसले, त्याचे वाईट वाटले नाही, असा टोला त्यांनी उध्दव ठाकरे यांना हाणला.
ठाकरे बंधु युती विषयी बोलतांना सामंत म्हणाले, त्यांना आधी एकत्र तर येऊ द्या. काही दिवसांपूर्वी नाशिक मध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची एकत्रित बैठक झाली. ज्या मध्ये मराठीचे गोडवे गायले गेले. त्याच ठिकाणी शिव्या दिल्या गेल्या. हे सर्वांनी पाहिले. नाशिकच्या बैठकीने सगळे काही दाखवले आहे.
आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर भाजपने १०० अधिक चा नारा दिला, राष्ट्रवादी नेही काही जागा जाहिर केल्या आहेत. महायुती किंवा या विषयी योग्य वेळी बोलू. आम्ही सर्व शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. या मेळाव्यात पक्ष संघटना विषयी चर्चा झाली असून प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्या अनुषंगाने आम्ही विभागनिहाय आढावा बैठक घेत आहोत.