नाशिक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ‘फिजिक्सवाला’ या खासगी शैक्षणिक कंपनीसोबत एम.सी.ए., एम.बी.ए., बी.सी.ए. आदी व्यावसायिक पदवीसाठी सामंजस्य करार करून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल व विद्यापीठ अनुदान आयोगाकडे करण्यात आली आहे. हे सर्व अभ्यासक्रम विद्यापीठात चालू असून केवळ ऑनलाईन पद्धतीने ते सुरू करण्यासाठी खासगी संस्थांसोबतचा करार संशयास्पद आहे. या बेकायदेशीर करारातून विद्यापीठ खासगी शैक्षणिक संस्थांना फायदा करत आहे का, या उपक्रमातून दिलेल्या पदव्या वैध कशा ठरतील, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अलीकडेच मुक्त विद्यापीठाने ‘फिजिक्सवाला’ या खासगी शैक्षणिक कंपनीबरोबर नियमित ऑनलाइन वर्ग घेण्यासाठी भागीदारी केली. त्यानुसार विद्यापीठ हे शैक्षणिक मान्यता, अनुपालन आणि पदवी जारी करण्यासाठी जबाबदार असेल, तर खासगी संस्था ‘फिजिक्सवाला’ तंत्रज्ञान व्यासपीठ, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि सामग्री वितरण व्यवस्थापित करणार आहे. या प्रक्रियेवर मुक्त विद्यापीठाच्या विद्वत परिषदेचे माजी सदस्य प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी आक्षेप घेतला. उभयतांतील सामंजस्य करार बेकायदेशीर व नियमांचे उल्लंघन करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विद्यापीठाचे विविध शैक्षणिक कार्यक्रम अभ्यास केंद्रांव्दारे चालवले जातात. आयोगाच्या नियमांनुसार फक्त विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात किंवा संस्थेत किंवा सरकारी मान्यताप्राप्त उच्च शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रम स्थापित करणे बंधनकारक आहे. हे अभ्यास केंद्रे विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच प्रशासकीय सहाय्य प्रदान करतात. विद्यापीठाने वैधानिक विद्यापीठाशी संलग्न नसणारी राज्यातील शेकडो अभ्यास केंद्रे बंद केली आहेत. मुक्त व दुरस्थ शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण कार्यक्रमांसाठी खाजगी सेवा प्रदात्यासोबत ’फ्रँचायझ‘ व्यवस्था अनुज्ञेय नाही. असे असताना फिजिक्सवाला, खासगी कंपनी अभ्यास केंद्र (लर्नर सपोर्ट सेंटर) कसे असू शकते, याकडे खडक्कार यांनी लक्ष वेधले. संयुक्तपणे ऑनलाइन अभ्यासक्रम आयोजित करण्यासाठी खासगी भागीदारांना आमंत्रित करण्यासाठी मुक्त विद्यापीठाने निविदा काढली होती का, हा प्रश्न आहे. या प्रकरणात लक्ष घालून कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

अभ्यास साहित्यात खासगी सहभाग

मुक्त विद्यापीठाने, आतापर्यंत स्वतःहून,विविध शैक्षणिक कार्यक्रमांसाठी अभ्यास साहित्य तयार केले आहेत. त्यासाठी संबंधित विषय तज्ज्ञांना आमंत्रित केले जाते व त्यांच्याकडून अभ्यास साहित्य तयार केले गेले आहे. हे साहित्य विद्यार्थ्यांना अभ्यास केंद्र किंवा ऑनलाइन पद्धतीत, विद्यापीठाच्या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करून दिले जाते. अभ्यास साहित्य तयार करण्यासाठी किंवा त्याच्या वितरणासाठी कोणत्याही खासगी भागीदारांचा सहभाग नव्हता. यामुळे फिजिक्सवाला कंपनीशी भागीदारी आश्चर्यकारक असल्याची बाब मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात मांडण्यात आली आहे.