जळगाव – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ लाख ६० हजार रुपयात फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर मुख्य संशयिताला ठाण्यातून जेरबंद केले आहे. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पाचोरा शहरातील मूळ रहिवासी हितेश रमेश संघवी आणि त्याची पत्नी अर्पिता संघवी, या दाम्पत्याने स्वतःला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे भासवून १८ नागरिकांना रेल्वेत तसेच इतर शासकीय कार्यालयांमध्ये नोकरी मिळवून देण्यासह म्हाडाचा फ्लॅट देण्याचे आमिष दाखवले होते. विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी त्यांनी दोघांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नावाने बनावट ओळखपत्रे, लेटरहेड आणि नियुक्तीपत्रे देखील तयार केली होती. आणि ती लोकांना दाखवल्यामुळे अनेक जण त्यांच्या बोलण्याला भुलले होते. ज्यामुळे अनेकांना नंतर मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागले.

नोव्हेंबर २०२४ पासून आतापर्यंतच्या कालावधीत संघवी दाम्पत्याने अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या काळात संशयित दाम्पत्याने हर्षल बारी यांच्याकडून सुमारे १३ लाख ३८ हजार रुपये, तसेच इतर लोकांकडून आणखी ४२ लाख २२ हजार रुपये उकळले. हा संपूर्ण आर्थिक व्यवहार जळगाव येथील कालिंका माता मंदिर परिसरातील एका दूध डेअरीत पार पडला.

संघवी दाम्पत्याकडून फसवणूक झालेल्या लोकांनी बराच काळ नोकरी तसेच म्हाडाचा फ्लॅट मिळण्याची प्रतीक्षा केली; मात्र, त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे सर्वांच्या लक्षात आले. त्यानंतर हर्षल बारी यांनी जळगावमधील शनिपेठ पोलिस ठाण्यात जाऊन संघवी दाम्पत्याविरोधात तक्रार नोंदवली. बारी यांच्या तक्रारीनंतर हितेश आणि अर्पिता संघवी यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपासासाठी सदरचे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. तेव्हापासून जळगाव पोलीस संघवी दाम्पत्याच्या मागावर होते.

दरम्यान, पोलिसांना फसवणूक प्रकरणी संशयित असलेल्या अर्पिता संघवी या महिलेला शोधण्यात यश आले. त्यानंतर तिचा पती आणि गुन्ह्यातील मुख्य संशयित हितेश संघवी यालाही पोलिसांनी ठाणे शहरातून अटक केली. या प्रकरणात संशयित संघवी दाम्पत्याकडून आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का, या बाबतची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस काढत आहेत. त्यासाठीच न्यायालयासमोर हजर केल्यानंतर प्रशासनाने हितेश संघवी याला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. प्रत्यक्षात, हितेश संघवी याला ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले, अशी माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांना दिली.