लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : शहरातील सराफ बाजारात बुधवारी सोन्याचे दर उच्चांकी ९१ हजार ८७६ रुपये आणि चांदीचे दर एक लाख पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्या तुलनेत शुक्रवारी सोन्याचे दर तोळ्यामागे ५०० रुपयांनी कमी होऊन ९१ हजार ३६१ रुपये आणि चांदीचे दर किलोमागे तीन हजार रुपयांनी कमी होऊन एक लाख एक हजार ९७० रुपयांपर्यंत खाली आले.

बुधवारी दरवाढीचा नवीन उच्चांक निर्माण करणारे सोने आणि चांदी कुठपर्यंत झेप घेते, याकडे ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांचे लक्ष लागले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी गुरूवारी सोने दरात ३०० रुपयांनी तसेच चांदी दरात एक हजार रुपयांची घसरण झाली. त्यानंतर शुक्रवारी देखील सोने दरात गुरूवारच्या तुलनेत प्रति तोळा २०० रुपयांची आणि चांदी दरात प्रति किलो दोन हजार रुपयांची घसरण झाली. तरीही तीन टक्के जीएसटीसह सोन्याचे दर ९१ हजारावर आणि चांदीचे दर एक लाखावर टिकून असल्याचे दिसून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाजारात सकारात्मक किंवा नकारात्मक वातावरण तयार झाल्यानंतर गुंतवणूकदारांचे वर्तन बदलते. अनेक गुंतवणूकदार सोन्या-चांदीकडे सुरक्षित गुंतवणुकीसाठी वळतात. किंवा त्यापासून दूर राहतात. त्यामुळे दोन्ही मौल्यवान धातुंच्या किंमतीत चढ-उतार दिसून येतो. आर्थिक अस्थिरता, मंदी, महागाई वाढणे किंवा युद्धसदृश परिस्थिती उद्भवल्यास गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानतात आणि अधिक प्रमाणात सोने खरेदी करतात. त्यामुळेही सोन्याचे दर सामान्यतः वाढतात. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोने व चांदीची किंमत मुख्यत्वे मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते. पुरवठा कमी झाला आणि मागणी अधिक असेल, तरीही त्यांचे दर वाढतात. पुरवठा अधिक आणि मागणी कमी झाली, तर मात्र किंमतीत घसरण होते. ही सर्व कारणे अलिकडे सोन्या-चांदीच्या बाजारभावावर परिणाम घडवत असल्याचे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांनी सांगितली.