जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी सोन्याचे दर नवीन उच्चांकावर पोहोचल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. सोमवारी सकाळी बाजार उघडताच सोने दरात पुन्हा बदल झाल्याचे निदर्शनास आले. ज्यामुळे सर्व जण कोड्यात पडले. बाजाराची अस्थिर परिस्थिती लक्षात घेता सोने खरेदी करावे की नाही, या विचारात अनेक जण पडले.

सध्या बाजाराचे लक्ष मंगळवारी जाहीर होणाऱ्या अमेरिका आणि भारताच्या जुलै महिन्यातील महागाईच्या आकडेवारीकडे केंद्रीत झाले आहे. अमेरिकेत महागाई वाढीची शक्यता वर्तवली जात असून, त्याचा सप्टेंबर महिन्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून होणाऱ्या व्याजदर कपातीच्या निर्णयावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ट्रम्प प्रशासनाचे टॅरिफ धोरणही गुंतवणूकदारांसाठी निर्णायक ठरणार आहे. अमेरिका आपल्या निर्णयावर कायम राहिल्यास धोकादायक मालमत्ता वर्गातील विशेषतः इक्विटी बाजारातील गुंतवणुकीवर दबाव येऊ शकतो. त्याचप्रमाणे सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, भू-राजकीय तणाव काहीअंशी कमी झाल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याच्या मागणीत आता थोडी नरमाई आली आहे. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १५ ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार असल्याच्या चर्चेमुळेही बाजारातील तणाव कमी झाला आहे. याचा परिणाम म्हणून सोन्याच्या किमतीमध्ये काही प्रमाणात घसरण दिसत आहे. सोमवारी देखील मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदी दोन्हीच्या दरात घट नोंदवली गेली.

जळगावमध्ये शुक्रवारी अमेरिकेकडून आकारण्यात येणाऱ्या २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्काच्या प्रभावामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख चार हजार ५४५ रूपयांपर्यंत पोहोचले होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी देखील तेच दर कायम राहिले. त्यामुळे सोमवारी सोन्याचे दर कुठपर्यंत जातात, त्याकडे ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांचे लक्ष होते. प्रत्यक्षात, सोमवारी सकाळी बाजार उघडल्यावर शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत सोने दरात प्रति १० ग्रॅम ८२४ रूपयांची घट नोंदविण्यात आली. ज्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख तीन हजार ७२१ रूपयांपर्यंत खाली आले.

चांदीचे दर स्थिर

जळगावमध्ये शुक्रवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख १९ हजार ४८० रूपयांपर्यंत होते. नंतरच्या दोन दिवसात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात न आल्याचे सोमवारी चांदीचे दर स्थिरच राहिले. परिणामी, ग्राहकांनाही दिलासा मिळाला.