लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: अल निनोच्या प्रभावाने यंदा पावसाला विलंब होऊन त्यात विषमता राहू शकते असा अंदाज मे महिन्यात दिला गेला होता. अद्याप समाधानकारक चित्र नसले तरी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तो जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान गाठेल, अशी आशा बाळगता येईल. तसे न घडल्यास हंगाम संपल्यावर जलसाठ्याचा आढावा घेऊन पुढील वर्षाचे पाणी नियोजन करावे लागू शकते. पण, हंगामातील पावसावर हा विषय अवलंबून असेल, असे मत नूतन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त केले.

नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची मुंबई महापालिकेच्या सहआयुक्तपदी बदली झाली. या जागेवर शासनाने धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नियुक्ती केली. शनिवारी सायंकाळी शर्मा यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. मूळचे चंदिगडचे असणारे शर्मा हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २०१४ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या शर्मा यांनी यापूर्वी जळगाव येथे उपविभागीय अधिकारी, यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

आणखी वाचा-शहर स्वच्छता, कुंभमेळ्याच्या तयारीला प्राधान्य, नाशिक मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांचे प्रतिपादन

पदभार स्वीकारल्यानंतर शर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नाशिक हा राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा जिल्हा आहे. आकारमानाने मोठा असणारा हा जिल्हा विभागाचे मुख्यालय आहे. वेळोवेळी समोर येणारे प्रश्न, आव्हाने सांघिकपणे पेलली जातील. शासनाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक प्रमाणे धुळ्यातही अलीकडेच शासन आपल्या दारी उपक्रम पार पडला. त्यातून लाभार्थ्यांना कोणताही त्रास न होता एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचे लाभ कसा देता येतो, ही संकल्पना समोर आली. प्रत्येक विभागाच्या, नव्या अधिकाऱ्यांच्याही ते लक्षात आले. ही प्रक्रिया पुढील काळात देखील तशीच कायम राखली जाईल. महसूल विभागातील अनेक अधिकारी-कर्मचारी लाचखोरीच्या जाळ्यात सापडल्याच्या प्रश्नावर शर्मा यांनी संबंधितांच्या प्रकरणांचा आढावा घेतला जाईल. त्यातील बाबी लक्षात घेऊन संबंधितांवर कोणत्या प्रकारे कठोर कारवाई करायची हे निश्चित होईल असे नमूद केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितिन रहेमान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरूळे आदी उपस्थित होते.