नाशिक : शहरातील शिवाजीनगर भागात सर्व सोयीसुविधायुक्त सदनिका कमी किंमतीत देण्याच्या भूलथापा देत एका बांधकाम व्यावसायिकाने ३० गुंतवणूकदारांना सव्वा तीन कोटी रुपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. स्वत:च्या घराचे स्वप्न साकार होईल म्हणून काही गुंतवणूकदार बऱ्याच वर्षांपासून प्रतिक्षा करीत होते. प्रदीर्घ काळ लोटूनही सदनिकाही नाही आणि गुंतवलेली रक्कमही मिळत नसल्याने अखेर त्यांनी पोलिसात धाव घेतली.

याप्रकरणी संशयित बांधकाम व्यावसायिक तसेच अन्य संबंधितांविरुद्ध ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमान्वये गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित बांधकाम व्यावसायिक कुणाल घायाळ (पाईपलाईन रोड, गंगापूर रोड) हा फरार आहे. याबाबत अमोल भागवत यांनी तक्रार दिली. संशयित घायाळने ध्रुवनगर, धर्माजी कॉलनी भागात मौर्या हाईट्स या नावाने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील सदनिकांचे दस्तावेज ऑगस्ट २०१३ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत अनेक गुंतवणूकदारांना दिले. गुंतवणूकदारांवर भुरळ पाडण्यासाठी घायाळने के. के. डेव्हलपर्स आणि अंश प्रॉपर्टीज नावाने स्वत:चे अलिशान कार्यालय कॉलेज रोडवरील विसे मळा भागात थाटले होते. मोठा बांधकाम व्यावसायिक असल्याचा देखावा करीत त्याने अनेक खोटी आश्वासने दिली. कमी रकमेत सदनिका देण्याचे आमिष दाखवत मौर्या हाईट्स या इमारतीची जाहिरातबाजी केली.

हेही वाचा : यंदापासून महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव, उदय सामंत यांची घोषणा

सदनिकेसाठी भागवत यांच्याकडून ११ लाख ७० हजार रुपयांची रक्कम घेतली. अन्य गुंतवणूकदारांकडून अशाच प्रकारे पैसे घेऊन २४ सदनिकांचे ३० गुंतवणूकदारांना करारनामा, साठेखत, नोटरी जनरल मुखत्यारपत्र असे दस्तावेज संबंधित विभागात लिहून व नोंदवून दिले. गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारून इमारतीचे बांधकाम अपूर्ण ठेवले. मुदतीत त्यांना सदनिकेचा ताबा दिला नाही. त्यांच्याकडून स्वीकारलेल्या रकमेची अफरातफर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गुंतवणूकदारांची रक्कम परत न करता संशयित गायब झाला. सदनिका मिळेल, या आशेवर गुंतवणूकदारांनी अनेक दिवस वाट पाहिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अखेर त्यांनी बांधकाम व्यावसायिक कुणाल घायाळ आणि इतर संबंधितांविरोधात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. आतापर्यंत ३० गुंतवणूकदार पुढे आले असून संशयित बांधकाम व्यावसायिक घायाळ हा फरार असल्याची माहिती तपासी अधिकारी समाधान चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा : वाढत्या मागणीमुळे जंगलातील सफेद मुसळीच्या प्रमाणात घट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भूलथापांचा वर्षाव

संशयित बांधकाम व्यावसायिक कुणाल घायाळने मौर्या हाईट्स इमारतीत दोन खोल्या आणि एक स्वयंपाकगृहाची सदनिका कमी किंमतीत देण्याची जाहिरातबाजी केली. या किंमतीत मुद्रांक शुल्क व नोंदणी, कायदेशीर शुल्क, जीएसटी आदी सर्व प्रकारचा खर्च समाविष्ट असल्याचे दर्शविले. इतकेच नव्हे तर, प्रत्येक सदनिकाधारकास वाहनासाठी स्वतंत्र जागा, अद्ययावत किचन ट्रॉली, टीव्ही, फ्रिज, कपाट देणार असल्याची आश्वासने दिली. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दोन लाख ६७ हजार रुपयांचे अनुदान मिळेल. प्रकल्प रेराने मान्यता दिलेला असल्याचे म्हटले होते. अलिशान,चकचकीत कार्यालय आणि सर्व प्रकारच्या सोयी सुविधा याला गुंतवणूकदार भुलल्याचे दिसत आहे.