जळगाव – रोजगारासाठी नाशिकला गेलेल्या मुलीचे परस्पर कोल्हापूरला लग्न लावणाऱ्या व्यक्तींकडून मिळणाऱ्या सततच्या धमक्यांमुळे शहरातील एका वडिलांवर रविवारी गळफास घेण्याची वेळ आली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन महिलांसह तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
हरिविठ्ठल नगरात आई- वडील आणि दोन लहान भावंडांबरोबर राहणारी मुलगी रोजगारासाठी तिच्या एका मैत्रिणीसह जानेवारीमध्ये नाशिक येथे गेली होती. मे महिन्यात तिच्या लहान भावाशी जळगावमधील समता नगरातील सचिन अडकमोल नावाच्या व्यक्तीने भ्रमणध्वनीवर संपर्क साधला.
तुझ्या बहिणीचे कोल्हापूर येथे माझ्या दाजीच्या लहान भावाबरोबर लग्न झाले आहे, असे सांगितले. तसेच ती आपल्या लहान बहिणीचा वाढदिवस असल्याचे सांगून घरातून गेली, पण अजूनही कोल्हापूरला परत आलेली नाही. तिला कोल्हापूर येथे पाठवा. तुझ्या बहिणीला आणि लग्न लावून देणारी मध्यस्थी महिला मनीषा जैन आणि सुजाता यांना सोने व पैसे दिल्याचे संबधिताने सांगितले. त्यानंतर मुलीच्या भावाने त्याच्या बहिणीशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
काही दिवसांनी मुलगी जळगाव येथे वडिलांकडे आली. परंतु, दोन दिवसांनी मैत्रिणीकडे जाऊन येते, असे सांगून पुन्हा घरातून निघून गेली. त्यामुळे तिच्या वडिलांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद केली. दुसरीकडे, मुलीचे लग्न लावून देणाऱ्या दोन्ही मध्यस्थी महिला आणि पुरूषाने तिच्या आई-वडिलांकडे लग्नाच्या वेळी दिलेले सोने आणि पैसे मागण्यासाठी तगादा लावला. त्यांच्याकडून जास्तच त्रास होऊ लागल्याने रविवारी मुलीच्या वडिलांनी घरात कोणी नसताना गळफास घेतला.
दरम्यान, पोलिसांनी आठ दिवसांपूर्वी आमची तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला. अखेर मुलीच्या काकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांकडून दोन्ही महिला व पुरुषाच्या विरोधात रविवारी सायंकाळी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ पुढील तपास करत आहेत.