जळगाव – नागपूर ते पुणे दरम्यान सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे भुसावळसह जळगावच्या प्रवाशांची खूप मोठी सोय झाली आहे. त्यानंतर आता आणखी एक पुणे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडीला जिल्ह्यात अधिकृत थांबा मिळाला आहे. पुणे जाण्यासाठी सोयीच्या ठरणाऱ्या या गाडीला केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रविवारी हिरवा झेंडा दाखवला. प्रवाशांमधूनही त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले.
मुंबई-नागपूर किंवा पुणे-नागपूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून केली जात होती. त्या अनुषंगाने केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्या बाबतीत पत्र व्यवहार केला होता. त्यांच्या त्या प्रयत्नांना यश आल्याने पुणे-नागपूर (अजनी) मार्गावर आठवड्यातून सहा दिवस वंदे भारत एक्स्प्रेस धावण्यास सुरूवात देखील झाली आहे.
या व्यतिरिक्त, मंत्री रक्षा खडसे यांनी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रावेरसह वरणगाव, बोदवड, निंभोरा, मलकापूर आणि नांदुरा या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या काही गाड्यांना थांबा देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यांच्या त्या मागणीला सुद्धा यश आले असून, काही स्थानकांवर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा मंजूर झाला आहे. ज्यामुळे विभागातील रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय आता दूर होऊ शकणार आहे.
रक्षा खडसे यांनी नवी दिल्ली येथे रेल भवनात रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांची भेट घेऊन भुसावळ रेल्वे विभागातून धावणाऱ्या १२१५० दानापूर-पुणे एक्स्प्रेसला रावेर येथे, १२६५६/१२६५५ नवजीवन एक्स्प्रेसला बोदवड येथे, २२१७७/२२१७८ महानगरी एक्स्प्रेसला रावेर येथे, ११०५७/११०५८ अमृतसर-मुंबई एक्स्प्रेसला निंभोरा येथे, १२११३/१२११४ गरीब रथ एक्स्प्रेसला मलकापुर येथे, १२७१९/१२७२० जयपुर-हैदराबाद आणि नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेसला नांदुरा येथे, १२१२९/१२१३० आझाद हिंद आणि २०९२५/२०९२६ सूरत-अमरावती एक्सप्रेसला बोदवड येथे थांबा देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. प्रत्यक्षात, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्री रक्षा खडसे यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत पुणे-दानापूर एक्स्प्रेसला रावेर येथे तसेच अमरावती-सुरत एक्स्प्रेसला बोदवड आणि गरीब रथ एक्स्प्रेसला मलकापूर स्थानकावर थांबा मंजूर केला आहे.
दरम्यान, प्रायोगिक तत्त्वावर रावेर येथे पुणे-दानापूर ही एक्स्प्रेस थांबण्यास सुरूवातही झाली आहे. या गाडीला केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी रविवारी हिरवा झेंडा दाखवला. या वेळी रावेर-यावलचे आमदार अमोल जावळे, भाजपचे पदाधिकारी नंदकुमार महाजन आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. पुणे आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या रेल्वे गाडीला रावेर स्थानकावर अधिकृत थांबा मिळाल्याने प्रवाशी वर्गाने जल्लोष केला. ही गाडी शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची ठरणार असली, तरी त्यास येत्या काळात चांगला प्रतिसाद मिळाला पाहिजे. अन्यथा सुरू झालेला थांबा बंदही होऊ शकतो, असे रक्षा खडसे म्हणाल्या.