जळगाव – जिल्हा परिषद निवडणुकीची आरक्षण सोडत निघाल्यानंतर अनेक गट राखीव झाल्याने अध्यक्षपदावर डोळा ठेवून असलेल्या मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील समर्थकांच्या गडांना सुरूंग लागले आहेत. दरम्यान, आजी-माजी मंत्र्यांसह खासदार आणि आमदारांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सोय लावण्यासाठी आता सोयीचे आरक्षण असलेल्या गटांची चाचपणी सुरू केली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा खात्याचे मंत्रीपद आहे. त्यामुळे त्यांचे राज्यभर दौरे सुरू असतात. अशा वेळी स्वतःच्या पाळधी गावाकडे तसेच संपूर्ण मतदारसंघावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना मुलगा प्रताप याची चांगली मदत होत असते. प्रशासनावर सुद्धा आपले नियंत्रण असावे म्हणून त्यांनी मुलास गेल्या वेळी जिल्हा परिषदेवर निवडून आणले होते.
मात्र, त्यांच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गटात यंदा सर्वसाधारण महिला आरक्षण निघाले आहे. या बदलामुळे त्यांचा मुलगा प्रताप पाटील याची राजकीय गणिते बिघडली आहेत. महिला आरक्षणामुळे मंत्री पाटील यांना आता पाळधी गटातून आपल्या कुटुंबातील एखाद्या महिलेला उमेदवारी द्यावी लागेल. किंवा मुलगा प्रताप याच्यासाठी दुसरा पर्यायी गट शोधावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाळधी गटातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
जळगाव ग्रामीणमधील आठ जिल्हा परिषद गटांचे आरक्षण लक्षात घेता, धरणगाव तालुक्यात साळवा आणि जळगाव तालुक्यात शिरसोली गटाचे आरक्षण फक्त सर्वसाधारण आहे. उर्वरित गटांमध्ये अनुसूचित जमातीसह नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला आरक्षण निघाले आहे. पैकी म्हसावद गटात ओबीसी आरक्षण असले, तरी त्याठिकाणी पालकमंत्री पाटील यांचे कट्टर समर्थक पवन सोनवणे यांनी आधीच दावा सांगितला आहे.
दुसरीकडे, साळवा गट सर्वसाधारण असला, तरी तिथेही भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे तयारीत आहेत. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत सर्व प्रकारची मदत केली होती, त्यामुळे मंत्री पाटील त्यांचे विरोधात जाऊ शकणार नाहीत. अशा स्थितीत, एकमेव शिरसोली गटाचा पर्याय पालकमंत्री पाटील यांच्यासमोर मुलाच्या सोयीसाठी उरला आहे.
शिरसोली गटात शिंदे गटाचे चांगले जाळे आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही शिरसोली भागातून मंत्री पाटील यांना चांगले मतदान झाले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मुलगा प्रताप याच्यासाठी ते शिरसोली गटाचा विचार करण्याची शक्यता वाढली. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर हे सुद्धा शिरसोली गटाच्या निवडणुकीत त्यांचे पूत्र विशाल देवकर यांना उतरवून नवी खेळी खेळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशालची अद्याप राजकारणात एंट्री झालेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विशालला पुढे करण्याचा विचार माजी मंत्री देवकर यांनी केल्याचे बोलले जाते.
शिरसोली गटात देवकर परिवाराचे शैक्षणिक संकूल असून, त्यांचे त्या भागात चांगले प्रस्थ देखील आहे. एकूण चित्र लक्षात घेता युती न झाल्यास गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्यात पूत्र प्रेमापोटी पुन्हा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. मंत्री पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत देवकर यांचा पराभव केला होता.