नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आपला कृषिमाल परराज्यात पाठविण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या देवळाली-दानापूर ‘किसान रेल’ ही एक विशेष रेल्वेगाडी चालविली जाते. ही कृषी रेल्वेसेवा शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ही सेवा महाराष्ट्रातील देवळाली ते बिहारमधील दानापूर दरम्यान चालते. मध्य रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या मागणीची दखल घेत देवळाली-दानापूर शेतकरी समृध्दी विशेष रेल्वेचा कालावधी वाढविला आहे.

‘किसान रेल’ म्हणजेच विशेष कृषी रेल्वेसेवा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. शेतकऱ्यांना नाशवंत कृषी उत्पादने, जसे की फळे, भाजीपाला, दूध आणि मासे, परराज्यातील बाजारपेठांमध्ये कमी खर्चात पोहोचविण्यासाठी या कृषी रेल्वेसेवेमुळे मदत होते. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा उद्देश या रेल्वेसेवेमागील आहे.

नाशिकजवळली देवळालीपासूून सुटणारी ही कृषीरेल्वे दानापूर (बिहार) पर्यंत धावते..मालवाहतूक: नाशवंत शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी ही सेवा विशेषतः उपयुक्त आहे. यामध्ये डाळिंब, केळी, द्राक्षे, कांदा, टोमॅटो आणि इतर कृषी उत्पादनांचा समावेश आहे. माल पाठविण्यासाठी येणारा खर्चही कमी आहे. ही सेवा पहिल्यांदा ऑगस्ट २०२० मध्ये सुरू झाली आणि त्यानंतर ‘शेतकरी समृद्धी’ विशेष किसान रेल्वे म्हणून तिचे संचालन सुरू झाले. नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणेसारख्या इतर काही ठिकाणी या रेल्वेसेवेला अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत.

आता एक नोव्हेंबरपासून या रेल्वे सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०१०५३ देवळाली ते दानापूर ही रेल्वेसेवा एक नोव्हेंबरपासून ते १८ मार्च २०२६ पर्यंत प्रत्येक शनिवारी धावणार आहे. देवळाली येथून रात्री ८.१५ वाजता सुटते. तिसऱ्या दिवशी दानापूर येथे पहाटे ५.१५ वाजता ही गाडी पोहचते. या विशेष रेल्वे गाडीत १० व्हीपी डबे आणि १० सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत. व्हीपी प्रत्येक डब्याची क्षमता २३ टन मालाची आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही रेल्वेसेवा अधिक उपयुक्त आहे. जिल्ह्यातून कांदा, द्राक्षे आणि डाळिंब, टोमॅटो इतर राज्यांमध्ये पोहचविण्यासाठी या रेल्वेसेवची मदत होत आहे. शेतकऱ्यांसाठी अशा रेल्वेसेवेची असलेली गरज देवळाली ते दानापूर कृषी रेल्वेमुळे पूर्ण झाली आहे. या सेवेचा विसार करण्यात आल्याने अधिकाधिक संख्येने शेतकऱ्यांनी या विशेष रेल्वेसेवचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.