लोकसत्ता वार्ताहर

धुळे: आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करून २० मेपर्यंत दोन दिवसाआड पाणी पुरवठा न केल्यास मोर्चा काढून महापालिकेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकणार तसेच वीज पुरवठा सुरळीत न राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार, असा इशारा आमदार फारूक शहा यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

शहरातील विस्कळीत पाणी पुरवठा आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा या समस्यांवर प्रशासकीय अडचणी समजावून घेण्यासाठी आमदार शहा यांनी बुधवारी येथे शासकीय निवासस्थानाच्या दालनात वीज वितरण कंपनी आणि महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, वीज वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता म्हस्के, कार्यकारी अभियंता पाटील, महापालिकेचे अभियंता कैलास शिंदे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत ओगले, वीज विभागाचे कर्मचारी सी. सी. बागुल हे उपस्थित होते.

आणखी वाचा- नाशिक: फसवणूक टाळण्यासाठी सायबर दूत उपक्रम; शहर पोलीस सायबर शाखेचा पुढाकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी आमदार शहा यांनी मार्गदर्शन करतानाच अधिकाऱ्यांना तंबीही दिली. यावेळी वीज कंपनीचे अधिकारी आणि महापालिका अधिकारी यांच्यातच जुंपली. वीज खंडित होणे किंवा कमी दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने पाणी ओढणारे पंप पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या भरू शकत नाहीत, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाड होताच आमचे पथक घटनास्थळी पोहोचून लगोलग वीज सुरळीत करण्याचा प्रयत्न करते, अशी माहिती दिली. यावेळी आमदार शहा यांनी दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना कठोर ताकीद दिली. पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा सुरळीत न राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करू, असा इशारा दिला.