नाशिक – येवला येथील रस्त्यांची चाळण झाली असून खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. त्यातच आरोग्याची समस्याही उद्भवली आहे. येवला नगरपरिषदेच्या वतीने कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याने येवलेकरांमध्ये नाराजी पसरली असून या नाराजीला वाट करुन देत बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याचे पूजन करुन अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
येवल्यात विविध ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा नीट अंदाज येत नसल्याने दुचाकींचे अपघात वाढले आहेत. याशिवाय साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येवलेकरांना नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत अस्वच्छ पाणी मिळत असल्याने त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यातील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याने सर्दी, खोकला, हिवताप, चिकनगुनिया, डेंग्यू यांसारख्या आजारांची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. डेंग्यूचे डास साचलेल्या पाण्यात अधिक प्रमाणावर तयार होत असल्याची माहिती असूनही नगरपरिषदेकडून कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने येवलेकरांमध्ये नाराजी आहे. नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी नगरपरिषदेने तत्काळ रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी सातत्याने होत असतानाही नगरपरिषदेकडून सर्रासपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
हेही वाचा – नाशिक : अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्याचा अत्याचार
येवलेकरांची समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगर परिषदेच्या ढिसाळ तसेच नियोजनशून्य कारभाराचा निषेध म्हणून विविध ठिकाणच्या गल्ल्यांमधील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याचे जलपूजन केले. अशा प्रकारच्या आंदोलनाव्दारे नागरिकांच्या मनातील रोष व्यक्त करण्यात आला. नगरपरिषदेने लवकरात लवकर या आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पटेल, तालुकाध्यक्ष नकुल घागरे, शहराध्यक्ष गौरव कांबळे, धीरजसिंग परदेशी, शहर संघटक शैलेश कर्पे आदी उपस्थित होते.
हेही वाचा – नाशिक : दुचाकीस्वारास लुटणाऱ्या दोन जणांना अटक
येवल्यात खड्ड्यांसह अतिक्रमणही समस्या
पैठणींसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला येथे दूरवरुन ग्राहक येत असतात. शहरात आल्यावर त्यांचे स्वागत खड्डेमय रस्त्यांनी होते. खड्डे चुकविताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांमुळे कोणाला धक्का लागणार नाही ना, याचीही काळजी त्यांना घ्यावी लागते. येवल्यातील नागरिकांनाही शहरातील खड्ड्यांचा आणि अतिक्रमणांचा त्रास होत आहे. एकवेळ खड्डे बुजविले जातील परंतु, अतिक्रमण काढण्याची हिंमत नगरपरिषदेकडून दाखवली जाण्याची शक्यता कमीच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.