नाशिक : बिबट्यांचे मानवी वस्तीत वाढलेले हल्ले, त्यात होणारी मनुष्यहानी पाहता नागरिकांबरोबर आता वनविभागही आक्रमक झाला आहे. याअंतर्गत वन विभागाने चक्क बिबट्याला ठार मारण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे. बिबट्यांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी आता तातडीचा उपाय म्हणून त्याला ठार करण्याचा मार्ग अवलंबला जाणार आहे.
नाशिक पश्चिम वन विभागाअंतर्गत वनपरिक्षेत्रातील मानवास धोकादायक ठरेल, अशा पद्धतीने बिबट्यांचा वावर वाढला आहे. दोन महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात आयुष हा तीन वर्षीय बालक तसेच मंगळवारी श्रुतीक गंगाधरण या दोन वर्षाच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
पश्चिम नाशिक वनविभाग अंतर्गत वडनेर दुमाला परिसरात दोन महिन्यात दोन बालकावर हल्ला करून त्यांना ठार मारणाऱ्या बिबट्याविरुद्ध आता वनविभागही आक्रमक झाला आहे. उपवनसंरक्षक विभागाचे अध्यक्ष सिध्देश सावर्डेकर, सहायक वनरक्षक प्रशांत खैरनार, मानद वन्यजीवरक्षक वैभव भोगले, अभिजीत महाले, वनपरिक्षेत्र अधिकारी सुमीत निर्मळ आदींनी राज्य सरकारला यासंदर्भात पत्र दिले आहे.
पश्चिम नाशिक विभाग अंतर्गत नाशिक वनपरिक्षेत्रातील मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या बिबट्या या वन्यप्राण्यास अटकाव करण्यासाठी मानव वन्यजीव संघर्ष समितीची आढावा बैठक झाली. वडनेर दुमाला भागात राहणाऱ्या दोन वर्षीय श्रुतीक गंगाधरन या बालकाला घराच्या अंगणातून बिबट्याने उचलून नेले होते. दुसऱ्या दिवशी लष्करी जंगलात त्याचा मृतदेह आढळला.
आर्टिलरी सेंटर आजुबाजूला दाट झाडी असून बिबट्याला येण्याजाण्या करता मार्ग तसेच लपण्यासाठी मुबलक जागा आहे. घटना घराच्या आवारात घडली असून लहान मुलांवर हल्ला होणे प्राण्यांचे अस्वाभाविक वर्तन दर्शविते. भविष्यात अशा प्रकारे बिबट्या घराच्या आत घुसून हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. घटनेला कारणीभूत असलेला बिबट्या सदर क्षेत्रामध्ये आढळून आला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये, यासाठी ठोस उपाययोजना व्हावी. बिबट्या हा मानवी जीवितास धोकादायक झाला आहे.
भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्याकडून बिबट्याला जेरबंद करणे, त्याला बेशुद्ध करून पकडणे अथवा दोन्ही शक्य नसल्यास त्याला ठार करण्याची परवानगी मिळावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यात मानव व बिबट्या संघर्ष गंभीर स्वरुप धारण करीत आहे. अनेक भागात नागरिकांना संध्याकाळनंतर बाहेर फिरणे अवघड बनले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक बालकांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारने नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी दिल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.