शहर परिसरातील अंबड गाव, अंबड औद्योगिक वसाहत, चुंचाळे, दत्तनगर घरकुल आदी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भौगोलिक क्षेत्र मोठे असल्यामुळे अंबड पोलीस ठाण्याला अपयश येते. या ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी, यासाठी स्थानिकांसह नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे. रामदास दातीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “तुम्ही मला आता साधू बनवता का?”; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सवाल

या निवेदनासाठी नागरिकांची स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली असून २० हजार स्वाक्षरी झाल्या आहेत. शंभर टक्के नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे उद्दीष्ट पूर्ण करून आठ ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजता मोर्चाला सुरुवात केली जाणार आहे. सकाळी नऊ वाजता कारगिल चौक येथून प्रस्थान केल्यावर पाथर्डी फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्वजण मुंबईकडे रवाना होतील.

हेही वाचा >>> “एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली”; शिवसेनेच्या टीकेला नरेश म्हस्केंचे प्रत्युत्तर, म्हणाले…

अंबड औद्योगिक वसाहतीलगत चुंचाळे, दत्तनगर, संजीवनगर, अंबड लिंकरोड परिसरात दिवसेंदिवस नागरी वस्तीचा विस्तार होत असून या भागात गुन्हेगारी कारवायाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. हाणामाऱ्या, कामगारांची लूट, सोनसाखळी चोरी, भ्रमणध्वनी, पैसे हिसकावून घेणे, धमकी, मारहाणीसाखे प्रकार नित्याचेच झाले आहेत. येथून अंबड पोलीस ठाणे दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर असल्याने घटना घडल्यावर पोलीस येईपर्यंत गुन्हा करून पळून जाण्यात गुन्हेगार यशस्वी होत आहेत. याशिवाय अंबड पोलीस ठाण्याचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे असूनही त्याप्रमाणात कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु, लोकप्रतिनिधींकडून त्याचा पाठपुरावा केला जात नसल्याने प्रश्न कायम आहे.ही समस्या धसास लावण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, रामदास दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे, संदिप नाठे, हेमंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्यात येणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik to mumbai march for new police station amy
First published on: 02-10-2022 at 19:45 IST