नाशिक – लग्नाचे आमिष दाखवून मुंबईतील एका छायाचित्रकाराने शहरातील तरूणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हात ऊसनवार घेतलेले दीड लाख रुपये मागितल्याने संतप्त संशयिताने जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणीने मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यामुळे संतप्त झालेल्या संशयिताने नाजूक क्षणांचे छायाचित्र व बदनामीकारक चित्रफित समाजमाध्यमांत प्रसारित केली.

जयेश रजनीकांत जोशी (३५, मंगलकुंजजवळ बोरीवली पूर्व) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या बाबत शहरातील पीडित तरुणीने तक्रार दिली. डिसेंबर २०२२ मध्ये दोघांची ओळख झाली होती. गोरेगाव येथील ओबेरॉय थिएटरमध्ये छायाचित्रकार असल्याचे संशयिताने भासवले. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. एप्रिल २०२३ मध्ये गोरेगाव थिएटरमध्ये संशयिताने तरूणीचा विनयभंग केला होता. या बाबत जाब विचारला असता संशयिताने लग्न करण्याचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. नंतर तिला शेजारील लॉजमध्ये नेऊन बलात्कार केला. यावेळी काढलेले नाजूक क्षणांचे छायाचित्र व चित्रफिती समाजमाध्यमांत प्रसारित करण्याची धमकी देत त्याने तिला ब्लॅकमेल केले.

शहरातील तरूणीच्या घरी येऊन वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार मागील दोन ते अडीच वर्षांपासून सुरू होता. याच काळात संशयिताने तरूणीकडून सुमारे दीड लाख रूपये हात उसनवार घेतले होते. हे पैसे मागूनही परत केले नाही. त्याची फसवणुकीची वृत्ती लक्षात आल्याने तरुणीने लग्नास नकार दिला. याचा राग आल्याने संशयित जयेश जोशीने शिवीगाळ करीत तिला जिवे मारण्याची धमकी दिली. या बाबत युवतीने विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरून संशयिताने दोघांचे खासगी छायाचित्र व बदनामीकारक चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित केली. या घटनाक्रमाने धास्तावलेल्या पीडितेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी संशयित जयेश जोशीविरुद्ध बलात्कार व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव करीत आहेत.

अडीच वर्ष ‘ब्लॅकमेल’

डिसेंबर २०२२ पासून आतापर्यंत हा प्रकार सुरू होता. संशयिताने ‘ब्लॅकमेल’ करीत मुंबईतील गोरेगाव येथील ओबेरॉय थिएटर आणि युवतीच्या घरी अत्याचाराचे सत्र सुरू ठेवले. हात उसनवार घेतलेले सुमारे दीड लाख रुपये परत करण्यास टाळाटाळ केली. लग्नास नकार दिल्याने संशयिताने शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे तरूणीने मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. याची माहिती मिळताच संशयिताने खासगीतील छायाचित्र व बदनामीकारक चित्रफित प्रसारित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.