नाशिक : महायुतीत नाशिक लोकसभा जागेचा वाद विकोपाला गेला असताना भाजपपाठोपाठ आता राष्ट्रवादी अजित पवार गटानेही या मतदार संघावर हक्क सांगत शिवसेना शिंदे गटाकडून तो हिरावून घेण्यासाठी धडपड चालवली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. दिंडोरीची जागा भाजपला मिळाली. तडजोडीत उत्तर महाराष्ट्रातील किमान एक जागा मिळवण्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रयत्न आहे. भाजपने नाशिकची जागा शिवसेनेला देण्यास आधीच विरोध केला आहे. अखेरच्या टप्प्यात भाजप आणि अजित पवार गटाने शिवसेनेला खिंडीत गाठले आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊनही महायुतीकडून नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. तिन्ही पक्षांमध्ये या जागेसाठी रस्सीखेच आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकची जागा शिवसेनेकडे आणि महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच राहणार असल्याचे जाहीर केले होते. परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली. भाजप नेत्यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला.

हेही वाचा…नाशिक : काळ आला होता पण… जखमी शिक्षकांच्या मदतीला रुग्णवाहिका धावली

विद्यमान खासदाराच्या पक्षाला जागा सोडण्याबद्दल राज्यस्तरीय नेत्यांमध्ये एकमत आहे. त्यानंतर केंद्रीय समितीकडे नावे जातील. तेथून उमेदवारीची घोषणा होते. असे दाखले भाजपचे नेते ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. यामुळे नाशिकची जागा शिवसेनेकडे राहील आणि वादाचा मुद्दा केवळ उमेदवाराचा असल्याचे दिसत होते. परंतु, अखेरच्या टप्प्यात वेगळेच घडले. ही जागा शिवसेनेला देण्यास भाजपने कडाडून विरोध केला. १९८९ आणि १९९१ या दोन्ही निवडणुकीत या ठिकाणी भाजपचे दिवंगत नेते डॉ. दौलत आहेर हे विजयी झाले होते. पुढे जागा शिवसेनेला दिली गेली. सध्या शहरात भाजपची संघटनात्मक ताकद आहे. महापालिकेवर पक्षाची एकहाती सत्ता होती. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेवर वर्चस्व राहिले. यामुळे नाशिकची जागा भाजपला मिळण्याचा विषय प्रतिष्ठेचा करण्यात आला आहे.

शिवसेनेला ही जागा मिळू नये म्हणून भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटही पुढे आला आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील पक्षाची ताकद मांडून या जागेवर दावा सांगितला. जिल्ह्यात आमचे सहा ते सात आमदार आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार आहेत. तरीही भाजपच्या विद्यमान खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासाठी पक्षाने तडजोड केली. या बदल्यात राष्ट्रवादीला नाशिकची जागा हवी आहे. दिंडोरीची जागा आम्ही भाजपच्या मंत्र्यांसाठी सोडली. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकतरी जागा मिळणे आवश्यक असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. नाशिक मतदारसंघात २००४ मध्ये एकसंघ राष्ट्रवादीचे देविदास पिंगळे तर २००९ मध्ये समीर भुजबळ हे निवडून आले होते. मित्रपक्षांच्या दाव्यांनी शिवसेनेसमोरील अडचणी वाढतच आहेत. महायुतीत भाजप व राष्ट्रवादीने मिळून शिवसेना शिंदे गटाची कोंडी केल्याचे चित्र आहे.

हेही वाचा…नाशिक : आगीत घर खाक, साडेतीन लाखांचे नुकसान

नाशिक लोकसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे यावेळी आम्हीच ही जागा लढविणार आहोत. शिवसेनेचा उमेदवार धनुष्यबाण आहे. शिवसेनेला खिंडीत गाठण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. – अजय बोरस्ते (जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट)