scorecardresearch

नाशिक : गोदापात्रातील पायऱ्यांसाठी स्मार्ट सिटीने सुचविलेल्या दगडाचा पर्याय, जुन्या दगडांचा वापर अशक्य

गोदापात्र काँक्रिटीकरण मुक्तीच्या अनुषंगाने झालेल्या कामाची स्थिती नदीत पाणी असल्याने स्पष्ट होणार नसल्याचे गोदाप्रेमी देवांग जानी यांनी म्हटले आहे

नाशिक : गोदापात्रातील पायऱ्यांसाठी स्मार्ट सिटीने सुचविलेल्या दगडाचा पर्याय, जुन्या दगडांचा वापर अशक्य
गोदापात्रातील पायऱ्यांसाठी स्मार्ट सिटीने सुचविलेल्या दगडाचा पर्याय (image – लोकसत्ता टीम)

गोदावरी पात्रातील पाण्याची पातळी कमी करून सांडव्याच्या तोडफोडीदरम्यान वाहून गेलेल्या दगडाचा शोध घेतला गेला. तथापि, तो पुन्हा वापरता येण्याजोगा नसल्याने पायऱ्या पूर्ववत करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने आधी दाखविलेल्या बेसाल्ट दगडाने हे काम करावे लागणार आहे. याच ठिकाणच्या मंदिरात बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी विधीवत पूजन करून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. गोदापात्र काँक्रिटीकरण मुक्तीच्या अनुषंगाने झालेल्या कामाची स्थिती नदीत पाणी असल्याने स्पष्ट होणार नसल्याचे गोदाप्रेमी देवांग जानी यांनी म्हटले आहे

स्मार्ट सिटी योजनेच्या कामात रामकुंड परिसरात पुरातन पायऱ्या, सांडव्याची तोडफोड केली गेली होती. गोदापात्रातील देवी मंदिराजवळील सांडवा तोडण्यात आला. यशवंतराव पटांगण परिसर प्रतिबंधित क्षेत्र असतांना या ठिकाणी फरशा बसविण्याचे काम हाती घेतले गेले. गोदावरी पात्रातील देवीचा सांडवा पूर्ववत बांधणे, यशवंतराव महाराज पटांगण येथे तोडलेल्या पायऱ्या पुरातन पद्धतीने बसवून द्याव्यात, असा आंदोलकांचा आग्रह आहे. या पायऱ्यांसाठी बेसाल्ट दगड वापरला गेला होता. पुन्हा हा दगड मिळणे अवघड आहे. पावसाळ्यापूर्वी तुटलेल्या पायऱ्यांचे बेसाल्ट दगड जपून ठेवणे आवश्यक होते. मात्र तशी काळजी न घेतल्याने ते पुरात वाहून गेले. त्यामुळे गोदापात्र कोरडे करून त्या दगडांचा शोध घेऊन त्यांचा पुरातन पायऱ्या पूर्ववत करताना वापर करण्याचा नाशिककर आणि हिंदुत्ववादी संघटनांचा आग्रह स्मार्ट सिटी कंपनीने मान्य केला. त्यानुसार गोदावरी पात्रातील पाण्याची पातळी कमी केली गेली. पात्रात वाहून गेलेल्या दगडांचा शोध घेण्यात आला. स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, अन्य अधिकारी तसेच गोदाप्रेमी देवांग जानी यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा – शुभांगी पाटील यांच्याकडून बाळासाहेब थोरातांची भेट घेण्याचा प्रयत्न; सत्यजीत तांबेंनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पात्रात तुटलेल्या पायऱ्यांचे काही अवशेष मिळाले. ते एका ठिकाणी जमा करण्यात आले. परंतु, पायऱ्यांचा हा दगड वापरण्यायोग्य नसल्याचे पाहणीत उघड झाले. त्यामुळे पूर्वी ज्या दगडाचा पर्याय सुचविला गेला, त्या आधारे पायऱ्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. देवी सांडव्याची रचना आंदोलकांनी दिल्यास त्यानुसार काम करण्याची तयारी स्मार्ट सिटी कंपनीने दर्शविली आहे.

हेही वाचा – जळगाव जिल्हा दूध संघातील नोकरभरती रद्द; अध्यक्ष मंगेश चव्हाण यांची माहिती, खडसेंना दणका

या पाहणीतून फारसे काहीच निष्पन्न झाले नसल्याचे जानी यांनी म्हटले आहे. गोदा पात्रात अद्याप काही फूट पाणी आहे. पात्र पूर्णत: कोरडे केल्याशिवाय तळाखालील भागातील कामाची स्पष्टता होणार नाही. स्मार्ट सिटी कंपनीने पहिल्या टप्प्यात पाच कुंड काँक्रिटीकरणमुक्त करण्याचे काम हाती घेतले होते. अर्धवट कामामुळे तळाकडील भागात सळई आणि धारदार दगड असू शकतील. त्यामुळे भविष्यात स्नानासाठी पात्रात उतरलेल्या भाविकाला इजा देखील होऊ शकते. पात्र कोरडे करून तळाकडील भाग समतल करण्याची गरज आहे. पात्र कोरडे होण्यासाठी एप्रिल, मेपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले जाते. नदी पात्र कोरडे करण्याच्या प्रश्नात स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक असणारे मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप जानी यांनी केला. गंगापूर धरणातून आवर्तन सोडले गेले आहे. त्यामुळे पात्र पूर्णत: कोरडे करणे अशक्य असल्याचे स्मार्ट सिटी कंपनीने म्हटले आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 10:05 IST

संबंधित बातम्या