लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : मागील ६० वर्षांत सुरगाणा तालुक्यात अनेकांनी सत्ता भोगली, काहींनी तर ४० वर्षे एकहाती सत्ता उपभोगली. परंतु, केंद्र शासनाच्या यादीत सुरगाण्याची आकांक्षित म्हणजे अतिमागास तालुका म्हणून ओळख आहे. ही ओळख विकासाच्या माध्यमातून पुसून काढणार, तरच पुन्हा सुरगाणा तालुक्यातील जनतेला तोंड दाखविणार, असे आश्वासन राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. सभेत दिले.

महायुतीचे उमेदवार नितीन पवार यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी मंत्री मुंडे यांची सुरगाणा येथील पोलीस परेड मैदानात सभा झाली. मुंडे यांनी, सुरगाणा तालुक्यातून अरबी समुद्राकडे वाहून जाणारे पाणी लहान धरणे बांधून स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगितले. पाणदेवाचा वारसा चालविणारे नितीन पवार यांची दुसरे पाणदेव म्हणून भविष्यात ओळख निर्माण होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने लाडकी बहीण योजनेवर भरपूर टीका केली. पाच महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात पडल्याने विरोधकांची बोलती बंद झाली. कळवण मतदारसंघात कृषी भवन उभारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. आदिवासी संस्कृतीचे दर्शन होणाऱ्या डोंगर माऊली उत्सवाला येण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

आणखी वाचा-नाशिक: देवळालीतील पेचामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त, सचिवांकडून स्थानिक पातळीवर आढावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार पवार यांनी, सुरगाण्यातील दहशतीचा उल्लेख केला. सुरगाण्यात सभा घेणे अवघड होते. आपण निवडून आल्यानंतर लोकांमधील भीती कमी झाली आहे. सुरगाण्याची आकांक्षित अतिशय मागास असलेला तालुका अशी केंद्र शासनाच्या निकषांवर आधारित असलेली ओळख येत्या पाच वर्षांत विकासाच्या माध्यमातून पुसून टाकणार असल्याचे नमूद केले. पावसाळ्यातील सहा महिने काम संपल्यानंतर सहा महिने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करणार. तालुक्याला शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन कळवण तालुक्याच्या बरोबरीने विकास केला जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. यावेळी रवींद्र पगार, कौतिक पगार, जयश्री पवार, हेमंत पाटील, राजेंद्र भामरे आदी उपस्थित होते.