जळगाव – जिल्ह्यात शिवसेनेला (उध्दव ठाकरे) पडत्या काळात साथ देणाऱ्या अनेक निष्ठावानांनी आधीच साथ सोडली असताना, वैशाली सुर्यवंशी यांनीही मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत पाचोरा तालुक्यातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोडचिठ्ठी दिल्याने ठाकरे गटासाठी तो एक आणखी मोठा धक्का मानला जात आहे.
वैशाली सूर्यवंशी ह्या पाचोरा तालुक्याचे माजी आमदार दिवंगत आर.ओ.पाटील यांच्या कन्या असून, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार किशोर पाटील यांच्या चुलत बहीण आहेत. गेली दोन पंचवार्षिक शिवसेनेचे उमेदवार किशोर पाटील हे विरोधी पक्षांच्या उमेदवारांशी लढा देत होते. मात्र, या वेळच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना स्वतःच्या बहिणीशी लढा द्यावा लागला. माजी आमदार पाटील हयात असेपर्यंतच्या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचे खंदे समर्थक कार्यकर्ते किशोर पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना दिसत. यंदाच्या निवडणुकीत स्वतः वैशालीताई मैदानात असल्याने निष्ठावंत शिव सैनिकांची मनःस्थिती काहीशी दोलायमान झाली होती. शिवसेनेत पडलेले दोन्ही गट बहीण आणि भावात विभागले गेले. कधीकाळी एकत्र फिरणारे बहीण-भाऊ आणि पक्षाचे पदाधिकारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून आले.
निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्यावर स्वकीयांच्या विरोधातच लढण्याची वेळ आली. प्रत्यक्षात, जळगाव जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व सिद्ध झाल्याने वैशाली सूर्यवंशी यांना पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून ठाकरे गटाच्या कार्यक्रमांत सहसा दिसून न आलेल्या वैशाली सूर्यवंशी यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. प्रवेश घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची सविस्तर चर्चा देखील झाली होती. अखेर मुंबईतील प्रदेश कार्यालयात त्यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये रितसर प्रवेश केला. दरम्यान, वैशाली सुर्यवंशी यांचे स्वागत करताना त्यांच्यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे मंत्री महाजन म्हणाले.
पाचोऱ्याचे दोन वेळा आमदार राहिलेल्या वडिलांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वैशाली सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यांच्यासोबत पाचोरा-भडगाव तालुक्यातील ठाकरे गटाच्या तालुका व उपतालुका प्रमुखांसह, संघटक, नगरसेवक आणि गावोगावच्या अनेक सरपंचांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेश महामंत्री विजय चौधरी, मंत्री नितेश राणे, पाचोरा येथील माजी आमदार दिलीप वाघ, अमोल शिंदे, मधुकर काटे, डी. एम. पाटील, सुभाष मुंडे, बन्शीलाल पाटील, प्रदीप पाटील, अनिल पाटील, गोविंद शेलार आदी बरेच पदाधिकारी उपस्थित होते.